जिल्ह्यावर दुष्काळाची गर्द छटा

By Admin | Updated: July 6, 2014 00:24 IST2014-07-05T23:59:30+5:302014-07-06T00:24:58+5:30

उस्मानाबाद : सलग तीन वर्षांचा दुष्काळ आणि उन्हाळ्यात झालेली गारपीट, अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे़

Drought famine shade in the district | जिल्ह्यावर दुष्काळाची गर्द छटा

जिल्ह्यावर दुष्काळाची गर्द छटा

उस्मानाबाद : सलग तीन वर्षांचा दुष्काळ आणि उन्हाळ्यात झालेली गारपीट, अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे़ पावसाने ओढ दिल्याने यंदाचा खरीप हंगामही धोक्यात आला असून, आजवर केवळ ६ टक्के पेरणी झाली आहे़ पावसाअभावी जिल्ह्यातील तब्बल ८१ साठवण तलाव कोरडेठाक पडले असून, उर्वरित साठवण तलावात केवळ ३़३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़ या परिस्थितीत चालू आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली नाही तर शहरासह ग्रामीण भागातही तीव्र पाणीटंचाईसह भीषण दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे़
जिल्ह्यातील नागरिकांनी सलग तीन वर्षांचा भीषण दुष्काळ अनुभवला़ गतवर्षीच्या न भुतो न भविष्यती अशा दुष्काळाचाही जिल्ह्याने सामना केला़ दुष्काळानंतर चांगल्या परिस्थितीची अपेक्षा करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रबी हंगाम अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हिरावून नेला़ शासनाकडून मिळणारा तुटपुंजा निधीही अनेक शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही़ गतवर्षी जुलै महिन्यात जवळपास ५६ टक्के पेरणी झाली होती़ यंदा मात्र, पावसाने मोठी ओढ दिल्याने जिल्ह्यातील खरिपाच्या ३ लाख, ९० हजार, ५०० हेक्टरपैकी केवळ २५़३८०० हेक्टरवर ६ टक्के पेरणी झाली आहे़
गत महिन्यात तुळजापूर व उमरगा तालुक्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली होती़ त्यामुळे तुळजापूर तालुक्यातील १८़६६०० हेक्टरवर तर उमरगा तालुक्यातील ६़१००० हेक्टरवर पेरणी झाली आहे़ उर्वरित तालुक्यातील पेरण्या रखडल्या आहेत़ पेरणीपूर्व मशागतीची कामे केलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले असून, चालू आठवड्यात पाऊस झाला नाही, तर अनेक पिकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे़
जिल्ह्यातील २११ प्रकल्पापैकी ७७ लघु आणि ४ मध्यम असे ८१ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत़ यात परंडा तालुक्यातील साकत, खंडेश्वरी, चांदणी व कळंब तालुक्यातील रायगव्हाण या मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे़ तर उमरगा तालुक्यातील जकापूर, तुरोरी, भूम तालुक्यातील संगमेश्वर, परंडा तालुक्यातील खासापुरी या प्रकल्पातील पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे़ उर्वरित साठवण तलावात २१़४९६ दलघमी म्हणजे ३़३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Drought famine shade in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.