दुष्काळी घोर तरीही दारुविक्रीला जोर !
By Admin | Updated: March 24, 2016 00:49 IST2016-03-24T00:20:00+5:302016-03-24T00:49:56+5:30
बीड : दुष्काळामुळे बाजारपेठेतील उलाढालीवर मोठा परिणाम झालेला असताना दारुच्या मार्केटला मात्र, फारसा परिणाम नाही.

दुष्काळी घोर तरीही दारुविक्रीला जोर !
बीड : दुष्काळामुळे बाजारपेठेतील उलाढालीवर मोठा परिणाम झालेला असताना दारुच्या मार्केटला मात्र, फारसा परिणाम नाही. पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यात गुरुवारी दारुचा पाट वाहणार आहे. खास धुळवडीनिमित्त ७० हजार लिटर दारू आली आहे. रंगारंग ‘सेलिब्रेशन’साठी तरूणार्इंसह शौकिन सज्ज आहेत. ‘ड्राय डे’ च्या धास्तीने बुधवारीच दारु दुकानांमध्ये खरेदीसाठी उड्या पडल्याचे चित्र होते.
जिल्ह्यात दररोज साधारण तीस हजार बल्क लिटर दारु विक्री होते. धुळवडीला मद्य प्राशन करणाऱ्यांचा आकडा दुपटीहून अधिक असतो. त्यामुळे गुरुवारी एकाच दिवशी ७० हजार दारु रिचविली जाईल, असा अंदाज उत्पादन शुल्क विभागातील एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’जवळ व्यक्त केला. मात्र, हा झाला सरकारी आकडा! अवैध दारुच्या ‘मापा’चा तर हिशेबच नाही. रंगात न्हाऊन बेधुंद होताना ‘चिअर्स’कडे बहुतांश जणांचा कल असणार आहे. आपापल्या परीेने सर्वांनी पार्ट्यांचे बेत आखले आहेत. बुधवारपासून ‘पार्सल’चा साठा करुन ठेवण्याकडे अनेकांचा कल होता. दुष्काळामुळे यंदा अनेकांना पैशांची चणचण आहे. शिमग्यामुळे शौकिनांचा खिशावर खर्चाचा भार पडणार आहे.
एक हजार बकरे व तीन हजार कोंंबड्यांचा फडशा पडेल, असा अंदाज एका व्यापाऱ्याने ‘लोकमत’ जवळ व्यक्त केला. (प्रतिनिधी)
टंचाईमुळे ओल्यारंगाऐवजी कोरडे रंग वापरुन पाण्याचा अपव्यय टाळा. मद्यप्राशन करु नका. लहान मुलांकडे वाहने देऊ नका. शक्यतो घराबाहेर पडू नका. वाहन वापरणे टाळा. आवश्यकता असल्यास सुरक्षित वाहने चालवा. दारु पिऊन वाहने चालवू नका. रंगाच्या सणात अनुचित प्रकारामुळे बेरंग होणार नाही, याची काळजी घ्याच!