दुष्काळाचे दुष्टचक्र कायम
By Admin | Updated: July 7, 2014 00:15 IST2014-07-06T23:33:47+5:302014-07-07T00:15:33+5:30
जालना : जिल्ह्यात शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. मृग नक्षत्रापाठोपाठ, आर्द्रा नक्षत्रही कोरडे गेल्याने शेकऱ्यांचे डोळे ओले झाले आहेत.

दुष्काळाचे दुष्टचक्र कायम
जालना : जिल्ह्यात शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. मृग नक्षत्रापाठोपाठ, आर्द्रा नक्षत्रही कोरडे गेल्याने शेकऱ्यांचे डोळे ओले झाले आहेत. दोन वर्षांपूर्वीचा भयंकर दुष्काळ अनुभवलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांतून यावर्षी अद्यापपर्यंत पाऊस न झाल्याने मोठी चिंता व्यक्त होत आहे.
जालना जिल्ह्यात गत दोन वर्र्षांपूर्वी म्हणजेच २०१२ मध्ये भयंकर दुष्काळ पडला होता. त्यावेळेस म्हणजे
६ जुलै २०१२ पर्यंत जिल्ह्यात सरासरी ६८.६१ मि.मी. पाऊस झाला होता. मागील वर्षी २००. १८ मि.मी.पाऊस झाला होता. यावर्षी मात्र ६ जुलैपर्यंत जिल्ह्यात अत्यल्प २१.५५ मि.मी. पाऊस झाला आहे. म्हणजे मागील वर्षाच्या किमान दहापटीने कमी तर दोन वर्षांपूर्वीच्या दुष्काळाच्या तुलनेने तीन पटीने कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे ही परिस्थिती अत्यंत बिकट समजली जात आहे.
मागील वर्षी चांगला पाऊस पडल्याने शेतकरी आनंदी होता. मात्र त्यानंतर गारपीट झाल्याने शेतक ऱ्यांचा तोंडचा घास हिरावला. आधी दुष्काळ नंतर गारपीट यातून सावरून यावर्षी चांगला पाऊस पडेल, या आशेवर माहागामोलाचे बियाणे खरेदी करून ठेवले. जून महिना संपला. जुलै लागला तरी पाऊस पडत नसल्याने निसर्गापुढे शेतकरी हतबल झाले आहेत, संकटात सापडले आहेत. जीवन जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करून मोठ्या प्रमाणात कपास लागवड केली. ठिबकवर ती आजपर्यंत कशीबशी जगविली. पावसाअभावी विहिरींची पाणीपातळीही खालावल्याने ही कपाशी धोक्यात आलेली आहे. तसेच यावर्षी खरिपात मूग, उडीद, हरभरा आदींची पेरणी झाली नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. १५ जुलैपर्यंत अशीच परिस्थिती राहिल्यास २०१२ च्या दुष्काळापेक्षाही भयंकर परिस्थिती निर्माण होण्याची भीती जाणकर व्यक्त करत आहे. आधी दुष्काळानंतर गारपीट आणि आता परत दुष्काळ असे दुष्टचक्र शेतकऱ्यांच्या मानगुटीवर कायम असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे प्रशासनाने दुष्काळी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
अंबड: दुष्काळाच्या सावटामुळे तालुक्यातील बळीराजा, सर्वसामान्य नागरिक चिंताग्रस्त झाला आहे. ७ जून रोजी येईल, असे भाकीत वर्तविण्यात आलेला पाऊस तब्बल महिना उलटल्यानंतरही आगमनास तयार नसल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
खरीप हगांमाच्या एकूण पेरणी क्षेत्रापैकी ७ जुलैपर्यंत केवळ ५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने धूळ पेरणी केलेली कपाशी संपूर्णपणे धोक्यात आली आहे. शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे आहे. तसेच ठिबक सिंचनावरील कपाशीही धोक्यात आली आहे. मोकळया शेतांकडे पाहून शेतकऱ्यांच्या पोटात गोळा उठत आहे. आगामी काळात पाऊस न पडल्यास पोटच्या लेकरांना व जनावरांना जगवायचे कसे, या चितेंने बळीराजा हताश झाला आहे.
अंबड तालुक्यात पावसाची सरासरी ६६३.७० मि.मी. एवढी आहे. मागील वर्षी ७ जुलै पर्यंत तालुक्यात एकूण २३२.०० मि.मी.एवढया पावसाची नोंद होती. मात्र यावर्षी ७ जुलैपर्यंत केवळ २५.५७ मि.मी. पावसाची नोंद शासन दरबारी करण्यात आली आहे. तालुक्यात अद्यापपर्यंत एकही मोठा पाऊस झालेला नाही.
तालुका कृषी कार्यालयाच्या शासकीय आकडेवारीनुसार तालुक्यातील खरीप पेरणीचे एकूण क्षेत्र ६७ हजार ८०० हेक्टर एवढे आहे. मागील वर्षी जून महिन्यात ७१ हजार ८२० हेक्टर म्हणजेच १०७ टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली होती. विशेष म्हणजे मागील वर्षीची ही सर्व पेरणी शेतकऱ्यांनी जून महिन्यातच पूर्ण केली होती. यावर्षी दुष्काळाचे सावट गडद असून पाऊसच नसल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या नाहीत. कपाशीची केलेली धूळ पेरणी पूर्णपणे धोक्यात आली आहे. मोठा पाऊस न पडल्यास यावर्षी पेरणी होते की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व जलसाठे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्याचे आदेश दिले. प्रशासनाने या आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु अद्यापही अनेक जलसाठ्यांमधून अवैध पाणी उपसा केला जात आहे, हे वास्तव आहे. जलसाठे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यासाठी प्रशासनाने आणखी कठोर उपाययोजना आखण्याची गरज आहे. संभाव्य दुष्काळ निवारणार्थ प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली आहे.
आढावा बैठका घेतल्या जात आहेत, दुष्काळ निवारणाचे नियोजन करण्यात येत आहे. दुष्काळ निवारणासाठी शासन विविध योजना जाहीर करीलही, पंरतु या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होईल का? हा खरा प्रश्न आहे.
बाजारपेठेवर परिणाम
शेतकरी हा अंबड तालुक्याच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. शेतकरी हवालदिल झाल्याने सर्व बाजारपेठेत शुकशुकाट पसरला आहे. याचा सर्वात मोठा फटका बियाणे-खत बाजाराला बसला आहे. शहरातील मोंढा भागात पावसाळ््यात पाय ठेवण्यास जागा नसते. त्याच बियाणे-खत बाजारावर शोककळा पसरल्यासारखी स्थिती आहे. पावसाने ओढ दिल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहे. जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
उन्हाळ्याची तीव्रता कायम
परतूर : तालुक्यात पावसाळा लागून महिना उलटत असला तरी, अद्यापही उन्हाळ्याच्या खुणा कायम आहेत. पावसाने हजेरी लावली नसल्याने पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहेत. पावसासाठी शेतकऱ्यांचे डोळे अभाळाकडे लागले आहेत.
पावसाळा लागून महिना उलटत असला तरी, अद्यापही पाऊस पडला नाही. खरिपातील पिंकांच्या पेरणीची वेळ हुकत आहे. आता पेरणी झाली तरी उत्पन्नावर विपरित परिणाम होणार आहे. आजही उन्हाळ्यासारखीच परिस्थिती असल्याने पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत करून शेत तयार केली आहेत. मात्र पावसाचा पत्ताच नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शहरासह ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. भर पावसाळयात शेतजमीन काळीभोर दिसत आहेत. काही शेतकऱ्यांनी ठिबकवर कपाशीची लागवड केली आहे. परंतु विहिरी व कूपनलिकांना असलेले जेमतेम पाणीही आता दम तोडू लागले असल्याने ही कपाशी धोक्यात आली आहे.
ऊस व इतर बागायती पिकांना पाणी नसल्याने ही पिकेही धोक्यात आली आहेत. ऊस वाळू लागला आहे. मोसंबीच्या फळांना गळ लागली आहे. भाजीपाल्याची नवीन लागवड तर दूरच मात्र आहे तोच भाजीपाला शेतात पाण्याअभावी सुकत आहे. बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने भाव गगनाला भिडले आहेत.
दिवसा ढग, रात्री चांदणे
आकाशात येणारे ढग जोराचा वारा अडथळा ठरत आहेत. दिवसा जोराचा वारा व रात्री पडणारे चांदणे, पावसाळ्यात अशी परिस्थिती म्हणजे दुषकाळाची चाहूलच होय. पावसाचा पत्ताच नसल्याने बियाणे बाजारातही शुकशुकाट आहे. काही शेतकऱ्यांनी दरवर्षी प्रमाणे पावसाच्या भरवशावर खरेदी करून ठेवलेले खते बी, बियाणे घरातच पडून आहेत. एकूणच भर पावसाळयात, उन्हाळ्याच्या खुणा कायम असल्याने शेतकऱ्यांबरोरच सर्वच हवालदिल झाले आहेत.