पावसाअभावी किनवट तालुक्यावर दुष्काळ
By Admin | Updated: August 3, 2014 01:13 IST2014-08-03T00:27:43+5:302014-08-03T01:13:48+5:30
किनवट : जुलैअखेर यंदाच्या पावसाळ्यात केवळ १३९ मि़मी़ इतक्या पावसाची नोंद झाली आहे़ गतवर्षी ही सरासरी ८०२ मि़मी़ इतकी होती़ पावसाची सरासरी पाहता तालुक्यात भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे़

पावसाअभावी किनवट तालुक्यावर दुष्काळ
किनवट : जुलैअखेर यंदाच्या पावसाळ्यात केवळ १३९ मि़मी़ इतक्या पावसाची नोंद झाली आहे़ गतवर्षी ही सरासरी ८०२ मि़मी़ इतकी होती़ पावसाची सरासरी पाहता तालुक्यात भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे़
पावसाळा लांबल्याने नव्हे लांबतच गेल्याने तालुक्यावर कोरड्या दुष्काळाचे गडद संकट उभे टाकले आहे़ ७१ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाल्याची नोंद पाहता खरीप हंगामात दुबार-तिबार पेरणी करावी लागल्याने तालुक्यातील शेतकरी कोरड्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या सावटाने हवालदिल झाला आहे़ खरीप हंगामात पेरणीसाठी ७९ हजार ७०० हेक्टर क्षेत्र सर्वसाधारण लागवडीखाली असताना ३१ जुलैअखेर प्रत्यक्षात ७१ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली़ पाऊस लांबल्याने या दरम्यान जसजसा पाऊस पडेल तसतशी शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी केली़ पण मध्येच पाऊस दडी मारू लागल्याने दुबार, तिबार पेरणी करूनही उगवण न झाल्याने महागामोलाचे बियाणे वाया गेले़ पेरलेल्या बिण्यांची उगवणक्षमता म्हणावी तशी नसल्याने पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांचे साधारणत: दहा बॅगपैकी चार बॅग बियाण्यांची उगवण झाली़ सहा बॅग वाया गेल्या़ मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांचे तर मोठे नुकसान होवून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे़
जुलैअखेर ५७५ मि़मी़ इतका पाऊस व्हायला पाहिजे असताना यंदा जुलैअखेर १३९ मि़मी़ इतक्या पावसाची नोंद झाली़ गतवर्षी ही नोंद ८०२ मि़मी़ इतकी होती़ यावर्षीच्या पावसाळ्यातील नोंद पाहता अवर्षणाचे संकट तालुक्यावर उभे टाकल्याची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे़ गतवर्षीच्या पावसाचा उच्चांक व यावर्षीचा निचांक पाहता नदी, नाले, तलाव कधी नव्हे, ते कोरड्या अवस्थेत जुलै महिन्यात आहे़ भूगर्भही खोल गेला नव्हे, पार आटला आहे़
पांढरे सोने म्हणविल्या जाणाऱ्या कापूस या नगदी पिकाची पेरणी ४८ हजार हेक्टर क्षेत्रात झाली आहे़ सोयाबीन १३ हजार २०० हेक्टर क्षेत्रात, तूर ५ हजार ५०० हेक्टर, ज्वारी १ हजार ३०० हेक्टर व इतर पिकांची ३ हजार २०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे़ दरवर्षी ३१ जुलैअखेर कापूस पिकाला खताची दोन मात्रा होते़ निंदण उगवणे ही कामेही प्रगतीपथावर असते़ पण यंदा आता कुठे बियाण्याची उगवण होताना दिसत आहे़ ओलिताची सोय नसल्याने कोरडवाहू शेतीवरच अवलंबून असलेला शेतकरी पुरता नागवला आहे़
कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर ही पिके जमिनीला भिडूनच असल्याने एकूणच तालुक्यातील विदारक चित्र पाहता तालुक्यावर कोरड्या दुष्काळाचे संकट कायमच आहे़ यापुढे पाऊस बरसला तरी खरीप हंगामाच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे़ उसनवारी, बँकेचे पीककर्ज काढून केलेली पेरणी एकदा, दोनदा नव्हे तीनदा वाया गेल्याने कर्जाची परतफेड करावी, कशी ही चिंता शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे़
पडावयाचा पाऊस व पडलेला पाऊस तसेच गतवर्षीचा पाऊस पाहता शासनाने किनवट तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून पीककर्ज माफ करावे व दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे चालावा यासाठी शासनाने भरीव मदत करून हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे़ (वार्ताहर)