दुष्काळी ढग अन् इच्छुकांचे पीक
By Admin | Updated: August 20, 2014 00:24 IST2014-08-20T00:13:09+5:302014-08-20T00:24:12+5:30
विजय पाटील, हिंगोली देशात कॉंग्रेसविरोधी लाट असताना हिंगोली लोकसभेची जागा कॉंग्रेसच्या ताब्यात गेली. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांसाठी हा आशेचा किरण आहे.

दुष्काळी ढग अन् इच्छुकांचे पीक
विजय पाटील, हिंगोली
देशात कॉंग्रेसविरोधी लाट असताना हिंगोली लोकसभेची जागा कॉंग्रेसच्या ताब्यात गेली. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांसाठी हा आशेचा किरण आहे. मात्र त्यावेळी नसलेली लाट आता येईल, असा भाजपा-सेना युतीचा होरा आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ असला तरी राजकीय पक्षांकडे इच्छुकांचे पीक आले आहे. परिणामी, योग्य मशागत न झाल्यास बंडाळीचे तण डोके वर काढणार यात शंका नाही.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागेल, अशी स्थिती आहे. हिंगोलीचे विद्यमान आ.भाऊराव पाटील गोरेगावकर व वसमतचे आ.जयप्रकाश दांडेगावकर यांची उमेदवारी निश्चितच असल्यात जमा आहे. त्यामुळे येथे सत्ताधाऱ्यांत तेवढी चलबिचल नसली तरी विरोधी गटात उमेदवारीसाठी अनेकांचे देव पाण्यात आहेत.
कळमनुरीतील राजीव सातव हे आता खासदार झाले आहेत. त्यामुळे येथे कॉंग्रेसमध्ये किमान ९ जणांना उमेदवारी पाहिजे आहे. प्रमुखांपैकी डॉ.संतोष टारफे, संजय बोंढारे, दिलीपराव देसाई, गयबाराव नाईक, जकी कुरेशी ही नावे चर्चेत आहेत. येथे सर्वांनी एकमत करून हा आकडा दोन ते चारपर्यंत खाली आणला तर उमेदवारी न मिळाल्याचा हिरमोड टाळता येणार आहे. शिवाय लोकसभेला जी एकजूट दाखविली तीच पुढे राहिली तरच सगळे सुरळीत होईल.
दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसही ही जागा आता पुन्हा आम्हाला द्या म्हणून जोर लावत आहे. त्यांचेही इच्छुक कमी नाहीत. अॅड. शिवाजी माने, डॉ.जयदीप देशमुख आदींचा यात समावेश आहे. भाजपानेही या जागेसाठी मुलाखती घेतल्या. सात जण इच्छुकांच्या रांगेत आहेत.
कळमनुरीत शिवसेनेचे माजी आ.गजानन घुगे हे दावेदार असले तरी पक्षातच अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. त्यात डॉ.वसंतराव देशमुख, माजी जि.प.अध्यक्ष गोविंदराव गुट्टे, जिल्हाप्रमुख संतोष बांगर आदी आहेत. त्यातच माजी खा.सुभाष वानखेडे यांचा वेगळा गट सक्रिय आहे, हे लपून राहिले नाही.
वसमतमध्ये फारसे वेगळे चित्र नाही. सेनेतील वेगळा गट थेट पडद्यावरच आला आहे. माजी आ.जयप्रकाश मुंदडा यांच्यासमोर अॅड.शिवाजी जाधव यांच्या रुपाने सवतासुभा उभा केला जात आहे. पूर्वी राष्ट्रवादीकडून जाधव हे लोकसभेसाठी इच्छुक होते. त्यांचा हा नवा डाव कोणासाठी डोकेदुखी ठरेल, हे अजूनतरी कळायला मार्ग नाही. अजूनही बरेच जण कोणत्यातरी पक्षाची उमेदवारी मिळवून रिंगणात षड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत.
हिंगोलीत कॉंग्रेसचे आ.गोरेगावकर यांच्याशी दोन हात करायला भाजपाकडून कोण उमेदवार राहील, याची संभ्रमावस्था आहे. तानाजी मुटकुळे हे गतवेळचे पराभूत उमेदवार प्रमुख दावेदार मानले जात आहेत. मात्र बाबाराव बांगर, अॅड.प्रभाकर भाकरे, प्रा.पंडितराव शिंदे, मनोज जैन, पुंजाजी गाडे, माणिकराव भिंगीकर, नव्याने कॉंग्रेसमधून प्रवेश केलेले मिलिंद यंबल यांच्यासह १३ जणांनी चुरस निर्माण केली आहे.
आतातर माजी आमदार बळीराम पाटील कोटकर हेही भाजपाकडून रिंगणात उतरायचे आहे, असे म्हणू लागले. त्यासाठी त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव येत असल्याचेही ते सांगत आहेत. त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांच्या गाठी-भेटी घेतल्या. माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर यांचीही चाचपणी सुरू आहे. मनसेचे संदेश देशमुख व ओम कोटकरही नशीब आजमावण्यास उत्सूक आहेत. घोडामैदान जवळच आहे. अजूनही अनिश्चिततेचे ढग दूर झाले नसले तरी लवकरच ते दूर होणार आहेत.