सभापतीपदावरून ओढाताण
By Admin | Updated: September 24, 2014 01:04 IST2014-09-24T00:56:32+5:302014-09-24T01:04:23+5:30
औरंगाबाद : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीनंतर आता विषय समिती सभापतीपदाची स्पर्धा सुरू झाली आहे.

सभापतीपदावरून ओढाताण
औरंगाबाद : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीनंतर आता विषय समिती सभापतीपदाची स्पर्धा सुरू झाली आहे. सभापतीपदावरूनही ओढाताण होऊ लागल्यामुळे मनसेचे ते पाच सदस्य पुन्हा सहलीवर गेले आहेत. दि. १ आॅक्टोबर रोजी सभापतीपदासाठी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात निवडीची विशेष सभा बोलावण्यात आली आहे.
मनसेच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषदेत पुन्हा काँग्रेस आघाडीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडले गेले आहेत. अडीच वर्षांच्या पहिल्या टर्ममध्येही काँग्रेसकडे अध्यक्षपदासह जलव्यवस्थापन व स्वच्छता आणि समाजकल्याण या दोन विषय समित्या होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसला उपाध्यक्षासह पशुसंवर्धन व कृषी आणि महिला व बालकल्याण या दोन विषय समित्या होत्या. मनसेला शिक्षण- आरोग्य आणि बांधकाम- अर्थ समितीची सभापतीपदे मिळाली होती. यावेळीही दोन सभापतीपदे मनसेला दिली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
मनसेच्या ८ सदस्यांपैकी पहिल्या टर्ममध्ये बबन कुंडारे व डॉ. सुनील शिंदे यांना सभापतीपदे मिळाली होती, तर दोन सदस्य पक्षापासून कायम फटकून वागले. त्यामुळे उर्वरित चार सदस्यांमध्ये आता सभापतीपद मिळविण्यासाठी स्पर्धा लागली आहे. शिवाय, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्येही स्पर्धा आहेच. त्यामुळे मनसेचे ते पाच सदस्य अजूनही सहलीवरच आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या मनसेकडे असलेले शिक्षण व आरोग्य किंवा बांधकाम सभापतीपद काँग्रेसला हवे आहे. त्या पदावर काँग्रेसचे विद्यमान गटनेते विनोद तांबे यांची वर्णी लागू शकते. तांबे यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेत पक्षाचे आदेश मानल्यामुळे सभापतीपदाची बक्षिसी त्यांना मिळण्याचे घाटत आहे.