बीसीयूडी संचालकांना डच्चू?

By Admin | Updated: August 4, 2015 00:37 IST2015-08-04T00:37:01+5:302015-08-04T00:37:01+5:30

औरंगाबाद : महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक (बीसीयूडी) डॉ. के. व्ही. काळे यांच्या कामावर कुलगुरू नाराज असून,

Drop Bcd's directors? | बीसीयूडी संचालकांना डच्चू?

बीसीयूडी संचालकांना डच्चू?


औरंगाबाद : महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक (बीसीयूडी) डॉ. के. व्ही. काळे यांच्या कामावर कुलगुरू नाराज असून, येत्या काही दिवसांत त्यांना कुलगुरूंकडून डच्चू मिळण्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीसीयूडी संचालकपदी डॉ. काळे यांची आॅगस्ट २०१४ मध्ये कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनीच नियुक्ती केली. मात्र वर्षभराच्या काळात बीसीयूडी संचालकांकडून कुलगुरूंना जे काम अपेक्षित होते ते झाले नसल्याची खंत कुलगुरूंनी बोलून दाखविली आहे. सोमवारीही पत्रकारांशी बोलताना बीसीयूडी संचालकांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. बीसीयूडी संचालकांचा विद्यापीठाच्या विविध विभागातील प्राध्यापकांशी संवादच नसल्याचे ते म्हणाले. विभागातील प्राध्यापकांच्या ज्या अडचणी असतील त्यांच्याकडे लक्ष देणे अपेक्षित असल्याचे कुलगुरू म्हणाले. मात्र, हे काम व्यवस्थित होत नाही. मी तरी एखाद्या माणसाला किती वेळ सांगणार, अशी व्यथाही त्यांनी बोलून दाखविली. महिनाभराआधीही कुलगुरूंनी डॉ. काळे यांच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. विद्यापीठातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुलगुरू डॉ. चोपडे यांनी बीसीयूडी संचालकांकडून आलेल्या अनेक फायलीही रोखल्या आहेत. फायलींवर योग्य प्रकारे रिमार्क नसणे किंवा संदिग्ध पद्धतीने विषय सादर करणे आदींमुळे या फायली कुलगुरूंनी रोखल्या आहेत. राज्य शासनातर्फे नवा विद्यापीठ कायदा प्रस्तावित आहे. हा कायदा मंजुरीसाठी विधिमंडळाच्या डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. या कायद्यात बीसीयूडी संचालक हे पद न राहता त्याच्या अधिकाराचे विभाजन करण्यात आले आहे. मात्र, हा कायदा अस्तित्वात येण्याच्या आधीच बीसीयूडी संचालकांवर संक्रांत येण्याची चिन्हे आहेत. कुलगुरूंची नाराजी आणि त्यांनी रोखलेल्या फायली या बीसीयूडी संचालकांवरील त्यांचा विश्वास कमी झाल्याचेच मानले जात आहे. त्यामुळे बीसीयूडी संचालकांची गच्छंती लवकरच असल्याच्या चर्चेने वेग घेतला आहे.

Web Title: Drop Bcd's directors?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.