नगररोडवरील वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 20:16 IST2019-12-08T20:16:05+5:302019-12-08T20:16:23+5:30
या मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे वाहनधारकांना साऊथसिटी व लिंकरोडमार्गे ये-जा करावी लागत आहे.

नगररोडवरील वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त
वाळूज महानगर : औरंगाबाद-नगररोडवरील गोलवाडी फाट्यापासून नगर नाक्यापर्यंत वाहतूक कोंडी होत असल्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे वाहनधारकांना साऊथसिटी व लिंकरोडमार्गे ये-जा करावी लागत आहे.
औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे या पुलावरील खड्डे बुजविण्याचे व डांबरीकरणाचे काम पंधरा दिवसापंूर्वी सुरु करण्यात आले आहे.
या कामामुळे दररोज सकाळी व सायंकाळी वाहतुकीची कोंडी होत आहे. रेल्वे उड्डाणपुलावर शनिवारी सायंकाळी रोडरोलर नादुरुस्त झाल्याने दीड तास वाहतूक ठप्प होता. यानंतर छावणी व वाळूज वाहतुक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नादूरुस्त रोड रोलर पुलावरुन हटविल्यानंतर रात्री ८ वाजेच्या सुमारास या पुलावरील वाहतुक सुरळीत सुरु झाली.
रविवारीही या पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण सुरु असल्यामुळे दिवसभर या पुलावर वाहतुकीच्या कोंडीचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागला. गोलवाडी फाटा ते नगर नाका दरम्यान सतत वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे अनेक वाहनधारक साऊथसिटी व लिंकरोडमार्गे शहरात ये-जा करीत आहे. हा प्रमुख महामार्ग असल्यामुळे रस्ता दुरुस्तीचे काम वेगात पूर्ण करण्याची मागणी वाहनधारकांतून केली जात आहे.