पोलीस वाहनांचे चालकच विना बेल्ट अन् दुचाकीस्वार पोलीस विनाहेल्मेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:21 IST2021-02-05T04:21:17+5:302021-02-05T04:21:17+5:30
औरंगाबाद : रस्ते अपघात टाळण्यासाठी दरवर्षी वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) वाहतूक सुरक्षा पंधरवडा साजरा करण्याचे सोपस्कार ...

पोलीस वाहनांचे चालकच विना बेल्ट अन् दुचाकीस्वार पोलीस विनाहेल्मेट
औरंगाबाद : रस्ते अपघात टाळण्यासाठी दरवर्षी वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) वाहतूक सुरक्षा पंधरवडा साजरा करण्याचे सोपस्कार पूर्ण केले जातात. वाहतूक नियमांचा भंग करू नका, असे सांगणाऱ्या शहर पोलिसांच्या गस्तीवरील चारचाकी वाहनांचे चालक विनाबेल्ट वाहने चालवीत असल्याचे ‘लोकमत’ने सोमवारी केलेल्या रिॲलिटी चेकमधून समोर आले. एवढेच नव्हे, तर गस्तीवरील दुचाकीस्वारही विनाहेल्मेट दुचाकी पळवीत असल्याचे दिसले.
औरंगाबाद शहरात दरवर्षी सरासरी १५० प्राणांतिक रस्ते अपघात घडतात.
गतवर्षी कोरोना काळात लॉकडाऊनमुळे वाहने रस्त्यावर नव्हती. परिणामी अपघाताची संख्या ११४ पर्यंत घटली. या अपघातात १२१ जणांचे बळी गेले होते. रस्ते अपघातामधील मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त होतात. वाहतूक नियम पाळले तर रस्ते अपघात टळतात. वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक पोलीस आणि आरटीओ सतत दंडात्मक कारवाई करतात. मात्र, पोलीस कर्मचारीच वाहतूक नियम पाळत नसल्याचे सोमवारी ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमधून समोर आले. कैद्यांची ने-आण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पोलीस मुख्यालयातील मोबाइल पोलीस व्हॅनचा पोलीस आयुक्तालयापासून जिल्हा न्यायालयापर्यंत पाठलाग करण्यात आला, तेव्हा या व्हॅनचा मागील दरवाजा सताड उघडा होता. व्हॅनचा चालक विना सीटबेल्ट वाहन चालवीत होता. महावीर चौकात चालकाला कुणाचा तरी कॉल आला आणि गाडी चालवीत असताना ते मोबाइलवर बोलत होते. वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे धोकादायक ठरते. या गंभीर चुकीमुळे दुर्घटना घडते. मात्र, याकडे वाहनचालक पोलीस कर्मचाऱ्यांनीच दुर्लक्ष केेले आहे.
=========================
दुचाकीस्वार पोलीस विना हेल्मेट
विना हेल्मेट दुचाकी चालविणे धोकादायक व दंडनीय गुन्हा आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात दुचाकीचालकांनी हेल्मेट घालावे याकरिता विशेष मोहीम आणि जनजागरण अभियान राबविले. त्यांनी विना हेल्मेट अनेक दुचाकीस्वार पोलिसांवर प्रथम कारवाई केली. गतवर्षी वाहतूक पोलिसांतर्फे विना हेल्मेट १५ हजार ४६८ दुचाकीस्वारांना दंड ठोठावला. ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटीचेकमध्ये दुचाकीस्वार पोलीस जिल्हा न्यायालयाकडून महावीर चौकामार्गे पोलीस आयुक्तालयाकडे जात होता.
===========
विना हेल्मेट आणि डाव्या लाइनवर थांबला दुचाकीस्वार पोलीस
अदालत रोडकडून निघालेला दुचाकीस्वार पोलीस कर्मचारी महावीर चौक वाहतूक सिग्नलचा लाल दिवा पाहून थांबला, मात्र, त्याने दुचाकी रस्त्याच्या डाव्या लाइनवर उभी केली. विशेष म्हणजे वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने या पोलिसांशेजारी उभ्या अन्य दुचाकीस्वाराला तेथे थांबण्यास मनाई केली. या पोलीस कर्मचाऱ्याकडे दुर्लक्ष केले.