छत्रपती संभाजीनगर : शहर व जिल्ह्यातील रस्त्यांवर सुमारे १३७ अपघातांचे ब्लॅकस्पॉट असल्याची माहिती जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सादर करण्यात आली. रस्त्यातील दुभाजक तोडणे, गतिरोधकाची उंची प्रमाणापेक्षा जास्त-कमी करण्याचे बेकायदेशीर कृत्य करणारे व्यावसायिक, पेट्रोलपंप चालक, हॉटेलचालक यांच्यावर परिवहन, पोलिस आणि सार्वजनिक बांधकाम विभागांनी संयुक्त कारवाई करीत गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नुकतेच दिले.
अपघात होतील, अशा ठिकाणी गतिरोधक, रस्त्यावर विविध खुणा, दिशादर्शक फलक, पांढरे पट्टे, दुभाजक टाकण्याच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. शाळेसाठी असणाऱ्या विविध स्कूल बसेसची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्याचे ठरले आहे. वाहनांच्या तपासणी बरोबरच वाहन चालकांच्या आरोग्य तपासणीसाठी शिबीर घेण्यात येईल. एसटी स्थानकात वाहकांची आरोग्य तपासणीसाठी शिबिर घेण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले. महापालिका, जि.प, आरटीओ, पोलिस, बांधकाम विभाग, एमएसआरडीसीचे अभियंते बैठकीला उपस्थित होते.
गतिरोधक टाकण्यासाठी संयुक्त काम कराप्रमुख मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर, तसेच शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर शाळा, हॉस्पिटल जवळ गतिरोधक टाकावेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळ, पोलीस प्रशासन आणि आरटीओंनी यांनी यासाठी संयुक्तपणे काम करावे.
हॉटेल, पेट्रोलपंपांवर गुन्हे दाखल कराज्या ठिकाणी पेट्रोलपंप, हॉटेल चालकांनी रस्त्याचे दुभाजक तोडले आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच व्यावसायिकांकडून दुभाजक दुरुस्त करून घेण्याची कारवाई करावी. पेट्रोलपंपाच्या शेजारी दुभाजक तोडले असतील, तर पंपचालकांना नोटीस देऊन गुन्हा दाखल करावा.
अयोग्य रिक्षा चालविण्यामुळे अपघातशहरात ऑटोरिक्षा अयोग्य चालवण्याच्या पद्धतीमुळे अपघातांची संख्या मोठी आहे. वाहनचालकांची अल्कोहोल व वाहनांची तपासणी नियमित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत उपस्थित पोलिस, आरटीओ यंत्रणेला दिले.