डल्ला मारणाºया सुकेशिनीसह चालकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:12 IST2017-08-07T00:12:56+5:302017-08-07T00:12:56+5:30
मावशी आणि काकाचा आलिशान बंगला परस्पर विक्री करून, तसेच घरातील सुमारे २५ तोळ्यांचे दागिने, रोख ५ लाख रुपये, कार आणि मोपेड घेऊन पसार झालेली डॉक्टर तरुणी सुकेशिनी येरमे आणि तिचा वाहनचालक राजेंद्र माटे या दोघांना कोल्हापुरात मुकुंदवाडी पोलिसांनी पकडले.

डल्ला मारणाºया सुकेशिनीसह चालकाला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सिडको एन-४ सारख्या उच्चभ्रू वसाहतीतील मावशी आणि काकाचा आलिशान बंगला परस्पर विक्री करून, तसेच घरातील सुमारे २५ तोळ्यांचे दागिने, रोख ५ लाख रुपये, कार आणि मोपेड घेऊन पसार झालेली डॉक्टर तरुणी सुकेशिनी येरमे आणि तिचा वाहनचालक राजेंद्र माटे या दोघांना कोल्हापुरात मुकुंदवाडी पोलिसांनी पकडले. न्यायालयाने दोघांना ९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांनी सांगितले की, एन-४ येथील सुकेशिनीची मावशी व कॅन्सरतज्ज्ञ काका अनेक वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक आहेत. सुकेशिनी शिक्षणानिमित्त मावशीच्या एन-४ येथील बंगल्यात राहत होती. त्यांचा वाहनचालक राजेंद्र माटेही तेथेच राहत असे. मावशी आणि काका वर्षातून एकदाच शहरात येत आणि चार सहा दिवस राहिल्यानंतर अमेरिकेत निघून जात. सुकेशिनीने मावशीची संपत्ती विकण्याचा प्लॅन रचला. ठरल्यानुसार सुकेशिनी आणि राजेंद्र अडीच महिन्यांपूर्वी मावशीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख, कार आणि मोपेड चोरून पसार झाले. मावशीला पत्र पाठवून ही माहिती तिनेच कळविली. तिचे काका डॉ. शिवाजी गुणाले यांच्या भाच्याने मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक शिवाजी कांंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक साईनाथ गिते आणि कर्मचारी त्यांचा शोध घेत होते. मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपी ट्रेस झाले.
तिरुपती, गोव्याचेही पर्यटन...
कोल्हापुरातील रंकाळा तलाव परिसरातील हरिओमनगर येथे एक फ्लॅट भाड्याने घेऊन आरोपी तेथे राहत होते. दोन-चार दिवस फ्लॅटवर मुक्काम केला की, ते पर्यटनासाठी जात. गोवा, महाबळेश्वर, तिरुपती बालाजी आदी ठिकाणी ते फिरले.