क्रेनखाली चेंगरून चालकाचा मृत्यू
By Admin | Updated: June 29, 2014 00:40 IST2014-06-29T00:26:17+5:302014-06-29T00:40:00+5:30
परंडा : विहीर खोदाईचे काम चालू असताना क्रेन विहिरीत कोसळल्याने याखाली चेंगरून एकाचा जागीच मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी झाले.

क्रेनखाली चेंगरून चालकाचा मृत्यू
परंडा : विहीर खोदाईचे काम चालू असताना क्रेन विहिरीत कोसळल्याने याखाली चेंगरून एकाचा जागीच मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना तालुक्यातील खानापूर शिवारात २८ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. यातील जखमींवर बार्शीच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, परंडा-पिंपरखेड रस्त्यावरील खानापूर शिवारात रामचंद्र कुदळे (रा. खानापूर) यांच्या शेतात विहीर खोदाईचे काम चालू आहे. यावेळी आठ परस खोलवर तिघे कामगार खोदाई केलेले मटेरियल क्रेनच्या बकेटमध्ये भरण्याचे काम करीत होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास हे काम सुरू असतानाच अचानक बकेटसह क्रेन विहिरीत कोसळला. यात क्रेनचालक श्रीमंत (नाना) शिवाजी काळे (वय ३५) हेही क्रेनसह विहिरीत पडून क्रेनखाली चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत विहिरीत असलेले धनाजी दत्तात्रय काशिद (वय ३०) व ज्ञानदेव भागवत बारसकर (वय ३०, दोघे रा. जाकेपिंपरी, ता. परंडा) यांच्या अंगावर क्रेन कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले. यातील धनाजी कााशिद यांचा खुबा पूर्णपणे निकामी झाला असून, ज्ञानदेव बारसकर यांचा पाय व हात फ्रॅक्चर होवून दोघांच्या शारीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. या दोघांनाही बार्शी येथे खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मयत श्रीमंत काळे यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असून, याप्रकरणी परंडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, विहीर मालक रामचंद्र कुदळे हे मात्र घटना घडल्यापासून फरार आहेत.
पोलिस ठाण्यामध्ये तणाव
रूग्णालयात डॉक्टरांनी श्रीमंत काळे हे मृत झाल्याचे घोषित केल्यानंतर श्रीमंत काळे यांचे बंधू शिवाजी काळे, मनोहर काळे, पोपट काळे, पोलिस पाटील शांतीकुमार गरड, शहाजी पवार, सरपंच ज्ञानेश्वर काळे, राजेंद्र लांडगे, मनोज काळे आदी नातेवाईक परंडा पोलिस ठाण्यात गेले. त्यांनी पोलिस निरीक्षक हणमंत वाकडे यांची भेट घेऊन विहीर मालकावर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. परंतु, यावेळी वाकडे यांनी या लोकांना ठाण्याबाहेर काढा, असे फर्मान तेथील पोलिस कर्मचाऱ्यांना सोडले. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर केल्याने नातेवाईकांनी श्रीमंत यांचे शव ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी जि. प. गटनेते दत्ता साळुंके यांनी मध्यस्थी करून तणाव निवळला व नातेवाईकांनी काळे यांचे प्रेतही ताब्यात घेतले.
वडिलांना भोवळ
घटनेची माहिती मिळताच टाकळी (ता. परंडा) येथील श्रीमंत काळे यांच्या नातेवाईकांनी परंडा उपजिल्हा रूग्णालयाकडे धाव घेतली. येथे डॉक्टरांनी काळे यांना मयत घोषित केल्यानंतर हा धक्का सहन न झाल्याने श्रीमंत यांचे वडील शिवाजी काळे हे रूग्णालय आवारातच भोवळ येवून पडले.