उपशाविरुद्ध धडक मोहीम

By Admin | Updated: July 3, 2014 00:22 IST2014-07-02T23:32:58+5:302014-07-03T00:22:00+5:30

जालना : पावसाअभावी टंचाईग्रस्त परिस्थिती असताना विविध प्रकल्पांमधून बेसुमार पाण्याचा अवैध उपसा केला जात असल्याचे वृत्त ‘लोकमत टीम’ ने स्टींग आॅपरेशनद्वारे प्रकाशित केले.

Drive against rampant | उपशाविरुद्ध धडक मोहीम

उपशाविरुद्ध धडक मोहीम

जालना : जिल्ह्यात पावसाअभावी टंचाईग्रस्त परिस्थिती असताना विविध प्रकल्पांमधून बेसुमार पाण्याचा अवैध उपसा केला जात असल्याचे वृत्त ‘लोकमत टीम’ ने स्टींग आॅपरेशनद्वारे बुधवारच्या हॅलो जालना अंकात प्रकाशित केले. या विशेष वृत्ताची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी आज दुपारी जालना तालुक्यातील पीरकल्याण धरणाची अचानक पाहणी केली. यात त्यांनाही उघडपणे पाणी चोरी होत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी आकडे टाकून सुरू असलेल्या सात मोटारी जप्त करण्यात आल्या असून संबंधितांविरुद्ध तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतरही जिल्ह्यात बुधवारपर्यंत पावसाची हजेरी नव्हती. त्यामुळे संभाव्य ५९ गावे आणि १० वाड्यांमध्ये टंचाईची स्थिती असल्याचे वृत्त ‘लोकमत’ ने प्रकाशित केले होते. जिल्ह्यातील १६ प्रकल्प कोरडेठाक असून अन्य प्रकल्पांमधील जलसाठ्याची पातळीही कमी झाली. त्याचबरोबर १ जुलै रोजी ‘लोकमत टीम’ ने विविध प्रकल्पांच्या ठिकाणी जाऊन स्टींग आॅपरेशन केले असता प्रशासनाने जलसाठ्यांमधील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिल्यानंतरही उघडपणे पाण्याचा बेसुमार उपसा केल्याचे चित्र दिसून आले. हे वृत्त २ जुलैच्या अंकातून प्रसिद्ध होताच खळबळ उडाली. या वृत्ताची दखल घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या. जिल्हाधिकारी नायक यांनी लघुपाटबंधारे व सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती घेतली.
दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी नायक यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड, जालन्याचे तहसीलदार जे.डी. वळवी यांना समवेत घेऊन थेट पीरकल्याण धरण गाठले. तेथे सात विद्युत मोटारींद्वारे पाण्याचा अवैध उपसा सुरू असल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे विद्युत तारेवर आकडे टाकून या मोटारी सुरू होत्या. त्यामुळे पाण्यासोबत विजेचीही चोरी केली जात होती. या प्रकाराची अत्यंत गांभिर्याने नोंद घेऊन जिल्हाधिकारी नायक यांनी सदर विद्युत मोटारी तात्काळ जप्त करण्याचे आदेश देऊन मोटारी ज्यांच्या मालकीच्या आहेत, त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेश तहसीलदार वळवी यांना दिले. पाणी व वीज चोरीचे तहसीलच्या पथकाकडून पंचनामे करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक दिलेल्या या भेटीमुळे परिसरातील नागरिकही उत्सुकतेपोटी तेथे आले. जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे कुणीही अशाप्रकारे पाण्याचा उपसा करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी नायक यांनी यावेळी दिल्या. पीरकल्याण प्रकल्प परिसरात सुमारे पाऊण तासांच्या पाहणीनंतर जिल्हाधिकारी नायक जालन्याकडे परतले. (प्रतिनिधी)
पाण्याचा सुरू होता अवैध उपसा
जिल्ह्यात विविध प्रकल्पांमध्ये पाणी चोरी होत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ ने स्टींग आॅपरेशनद्वारे उघडकीस आणला होता. ठिकठिकाणची छायाचित्रेही प्रसिद्ध करण्यात आली होती. घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी व मंगरूळ या बॅरेजेसमधून, तळेगाव येथील धरणातून जालना तालुक्यातील जामवाडी येथील लघु पाझर तलाव, भोकरदन तालुक्यातील धामणा व पदमावती धरण तसेच केदारखेडा परिसरातील बानेगाव तलाव, जाफराबाद तालुक्यातील अकोला देव व जीवरेखा धरणातून, परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून पाण्याचा अवैध उपसा सुरू होता.
जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून ज्या प्रकल्पांच्या भागात पाणी चोरी होत असल्याचे लक्षात येईल, तेथील संबंधित जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्धही कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यापुढेही काही प्रकल्पांना अचानक भेटी देण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा मनोदय आहे. बुधवारी झालेल्या कारवाईप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड, तहसीलदार जे.डी. वळवी, तालुका जालना पोलिस ठाण्याचे पो.नि. विद्यानंद काळे, पोलिस नाईक ज्ञानेश्वर नागरे, दत्ता आढाव, बी.आर. जोशी हे उपस्थित होते.
विजेचीही चोरी...
पीरकल्याण येथील धरणातून बेकायदेशीर पाण्याचा उपसा केल्याप्रकरणी तसेच विद्युत तारेवार आकडे टाकून वीज चोरी केल्याप्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तहसीलदार वळवी यांनी दिली. त्यामध्ये प्रदीप आत्माराम पवार, संजय लक्ष्मण पवार, लक्ष्मण केसू राठोड, मदन नवनाथ पवार, जगन्नाथ गोपीनाथ पवार, अनिल बाबूलाल राठोड यांचा समावेश आहे.
प्रशासनाच्या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ
जिल्हाधिकारी नायक यांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ज्या प्रकल्पांमध्ये अशाप्रकारे पाण्याचा अवैध उपसा सुरू आहे, तेथील लोकांनी आपापल्या मोटारी काढण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कारवाईचे निर्देश दिले आहेत. पोलिस कारवाईच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पीरकल्याण पाठोपाठ आणखी काही ठिकाणी कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Drive against rampant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.