ठिबक सिंचनाला लागली गळती

By Admin | Updated: August 31, 2014 00:11 IST2014-08-30T23:43:09+5:302014-08-31T00:11:59+5:30

दगडू सोमाणी, गंगाखेड अनुदान प्राप्त होण्यासाठी असलेली वेबसाईट बंद असल्याने शासनाकडे हजारो शेतकऱ्यांचे अनुदान थकित राहिले असून, ठिबक सिंचन योजनेला गळती लागली आहे.

Drip irrigation leakage | ठिबक सिंचनाला लागली गळती

ठिबक सिंचनाला लागली गळती

दगडू सोमाणी, गंगाखेड
एक वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने सूक्ष्म सिंचन अनुदान प्राप्त होण्यासाठी असलेली वेबसाईट बंद असल्याने शासनाकडे हजारो शेतकऱ्यांचे अनुदान थकित राहिले असून, ठिबक सिंचन योजनेला गळती लागली आहे.
महाराष्ट्र शासनाने ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचनासाठी ६० टक्के अनुदान जाहीर केले आहे. पाण्याची बचत व पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी शासनाने ही योजना अंमलात आणली.
या योजनेमधील शेतकऱ्यांनी १०० टक्के रक्कम भरून ठिबक किंवा तुषार सिंचन अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करावा लागतो. चांगल्या कंपनीच्या ठिबक सिंचनासाठी १ हेक्टरला १ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते. यामध्ये ६० टक्के रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान स्वरुपात एक महिन्याच्या आत जमा करण्याचे शासनाने जाहीर केले होते. जुलै २०१३ पासून आजपर्यंत शासनाने ज्या शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजना राबविली, त्याचे अनुदान अद्यापपावेतो वितरित केले नाही. सूक्ष्म सिंचन अनुदान मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना विविध नमुन्याचे कागदपत्रे जमा करावे लागतात.
अनेक कार्यालयात खेटे घालून प्राप्त केलेले दस्तावेज वेबसाईटद्वारे शासनाकडे पाठविली जातात. त्यानंतर एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांचे अनुदान बँक खात्यावर जमा केले जाते. वर्ष २०१३-१४ मध्ये जुलै १३ पासून आज तेरा महिन्यांपर्यंत परभणी जिल्ह्यातील चार ते पाच हजार शेतकरी अनुदान रकमेच्या प्रतीक्षेत आहेत.
शासनाची अनुदान मिळवून देणारी वेबसाईट बंद असल्याने शेतकऱ्यांची कोट्यवधी रकमेची गुंतवणूक अडकून पडली आहे, अनुदान केव्हा मिळते या आशाळभूत नजरेने शेतकरी शासनाची वेबसाईट उघडण्याची वाट पाहत आहेत.
पावसाळा संपत आला मात्र भविष्यात पाणीटंचाई भासणार असल्याने शासनाने पाणी बचतीसाठी राबविलेली ठिबक सिंचन योजना कार्यान्वित होणे गरजेचे आहे. शासनाची वेबसाईट वर्षभर चालू राहिली तरच ठिबक सिंचनाकडे शेतकरी आकर्षित होतील, अन्यथा भविष्यात ठिबक सिंचनाला गळती लागल्याशिवाय राहणार नाही.

Web Title: Drip irrigation leakage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.