घरांचे स्वप्न धुळीस मिळाले...!

By Admin | Updated: December 30, 2015 00:45 IST2015-12-30T00:22:15+5:302015-12-30T00:45:56+5:30

वाळूज महानगर : औद्योगिक वसाहत परिसरात रो हाऊस देण्याचे आमिष दाखवून बिल्डर व जमीन मालकाने अनेकांना लाखोंचा गंडा घालून पोबारा केला आहे.

The dream of the house was rotten ...! | घरांचे स्वप्न धुळीस मिळाले...!

घरांचे स्वप्न धुळीस मिळाले...!


वाळूज महानगर : औद्योगिक वसाहत परिसरात रो हाऊस देण्याचे आमिष दाखवून बिल्डर व जमीन मालकाने अनेकांना लाखोंचा गंडा घालून पोबारा केला आहे. फसवणूक झालेले कामगार व नागरिक पैसे परत मिळविण्यासाठी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहेत.जमीन मालक सोमनाथ हिवाळे (रा. रांजणगाव) व बिल्डर योगेश जगदाळे (रा. हर्सूल), अशी आरोपींची नावे आहेत.
वाळूज एमआयडीसीतील कमळापूर येथे वर्षभरापूर्वी हिवाळे व जगदाळे यांनी मोर्या असोसिएटस्च्या वतीने श्री विठ्ठल सृष्टी हा गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले. चार एकर जमिनीमध्ये ७५१ रो हाऊसच्या या प्रकल्पातील घरांचा दीड वर्षात ताबा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.
सहा लाखांपासून तेरा लाखांपर्यंत सर्व सुविधायुक्त घरे मिळत असल्यामुळे आमिषाला बळी पडून वाळूज औद्योगिक परिसरातील बजाजनगर, पंढरपूर, रांजणगाव, सिडको वाळूजमहानगर आदी भागांतील कामगार व नागरिकांनी या प्रकल्पात घरे खरेदीचा निर्णय घेतला. घराच्या बुकिंगसाठी ५१ हजार ते ३ लाखांपर्यंतची रक्कम हिवाळे व जगदाळे यांनी जमा केली. पैसे भरलेल्या नागरिकांना बॉण्डवर करारनामा करून दीड वर्षात घराचा ताबा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पैसे भरून सहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे आपले पैसे परत मिळावेत, यासाठी नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा केला. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सिडको प्रशासनाची बांधकामासाठी परवानगी मिळत नसल्याचे सांगत हा गृह प्रकल्प रद्द केल्याचे सांगितले.
हिवाळे व जगदाळे यांनी सॅम्पल रो हाऊसचे बेसमेंटपर्यंत केलेले काम पाडून या ठिकाणी प्लॉटिंग विक्री सुरू केली. त्यामुळे घराची बुकिंग केलेल्यांना धक्का बसला. रो- हाऊसऐवजी तुम्हाला प्लॉट देऊत, अशी थाप त्यांनी मारली. प्लॉट मिळण्याचीही चिन्हे दिसत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे नागरिकांना समजले. अखेर विजय इंगळे यांनी २२ डिसेंबरला एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात हिवाळे व जगदाळे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यावरुन दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिवाळे व जगदाळे यांनी ५१ हजार ते ३ लाखांपर्यंतच्या रकमा जमा केल्या. सुमारे शंभर जणांकडून पैसे घेऊन त्यांनी ७० ते ८० लाख उकळल्याचा आरोप विजय इंगळे, योगेश चौधरी, लक्ष्मण लांडे पा., राजाराम अंबादे, दत्ता शिंदे, मुकेश मेश्राम, रेखा मेश्राम, लता राठी, अविनाश झुंजार आदींनी केला आहे.
फसवणूक झालेल्या नागरिकांना मंगळवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात कागदपत्रांसह चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. अनेक कामगारांनी कामाला दांडी मारून सर्व कागदपत्रे सोबत घेऊन सकाळी १० वाजता ठाण्यात हजेरी लावली होती. मात्र तपास अधिकारी फौजदार एम. बी. टाक हे ठाण्यात न आल्यामुळे नागरिक दुपारी तीन वाजेपर्यंत ठाण मांडून होते. फौजदार टाक हे नाईट ड्यूटी करून गेल्यामुळे ते येणार नाहीत, असा निरोप अन्य कर्मचाऱ्यांनी दिल्यामुळे चौकशीसाठी हजर झालेले नागरिक संतप्त झाले.

Web Title: The dream of the house was rotten ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.