‘परिश्रम आणि जिद्दीने पूर्ण केले स्वप्न’, ‘मिस ग्लोबल इंटरनॅशनल प्रिन्सेस’ विजेत्या सौंदर्यवतीचे मनोगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 05:34 IST2017-09-22T05:34:51+5:302017-09-22T05:34:53+5:30
रशियातील मॉस्को येथे झालेल्या ‘मिस ग्लोबल इंटरनॅशनल प्रिन्सेस २०१७’ या स्पर्धेची विजेती ईशा अग्रवाल हिने गुरुवारी (दि.२१) ‘लोकमत’ला भेट दिली. यावेळी झालेल्या चर्चेतून तिने लातूर ते मॉस्कोपर्यंतचा तिचा यशस्वी प्रवास उलगडला.

‘परिश्रम आणि जिद्दीने पूर्ण केले स्वप्न’, ‘मिस ग्लोबल इंटरनॅशनल प्रिन्सेस’ विजेत्या सौंदर्यवतीचे मनोगत
औरंगाबाद : रशियातील मॉस्को येथे झालेल्या ‘मिस ग्लोबल इंटरनॅशनल प्रिन्सेस २०१७’ या स्पर्धेची विजेती ईशा अग्रवाल हिने गुरुवारी (दि.२१) ‘लोकमत’ला भेट दिली. यावेळी झालेल्या चर्चेतून तिने लातूर ते मॉस्कोपर्यंतचा तिचा यशस्वी प्रवास उलगडला.
ईशा मूळची लातूरची. तिचे वडील ज्वेलरी व्यावसायिक़ उच्च शिक्षणासाठी तिने पुणे गाठले. तेथे पोषणशास्त्रात शिक्षण पूर्ण केले. ती म्हणते, ‘स्वत:च्या हिमतीने आणि क्षमतेने स्वत:च्या पायावर उभे राहायचे हा विचार माझा पक्का होता. सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न मला स्वस्थ बसू देत नव्हते. चार वर्षांपूर्वी मी ‘एसआयसी’ मिस पुणे स्पर्धा जिंकली आणि खºया अर्थाने माझा प्रवास सुरू झाला.
पहिले यश मिळाल्यानंतर ईशाचा आत्मविश्वास दुणावला. तिने एक-एक करत अनेक स्पर्धांमध्ये स्वत:च्या सौंदर्याने आणि बुद्धिमत्तेने यश प्राप्त केले. तिने सांगितले, ‘सौंदर्य स्पर्धांमध्ये तुमचे केवळ सौंदर्य नाही तर त्यासोबत टॅलेंट, बुद्धिमत्ता, आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व, इतरांशी जुळवून घेण्याची कला अशा अनेक गोष्टींवर तुमचे परीक्षण केले जाते.’
आतापर्यंत ईशाने ‘मिस इंडिया एक्विसीट २०१५’, ‘मिस फोटोजेनिक क्वीन २०१५’ आणि थायलंड येथे ‘माइलस्टोन मिस इंडिया इंटरनॅशनल प्रिन्सेस २०१७’ आदी मुकुट मिळविले आहेत. अमेरिकेत झालेल्या ‘मिस इंटरनॅशनल एक्विसीट २०१५’ स्पर्धेतही तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत ती ‘मिस फोटोजेनिक इंटरनॅशनल क्वीन २०१५’ ठरली होती.
आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रवास खूप अवघड होता, असे ती सांगते. ‘तसे पाहिले तर मी या क्षेत्रात फार उशिराने आले. लातूरमध्ये याविषयी माहिती किंवा पोषक वातावरण नाही. पुण्यात गेल्यावर माझ्यासाठी नवे आकाश खुले झाले. माझी जी आवड आहे तिलाच माझे करिअर करण्याचा मी निर्णय घेतला.
सुरुवातीला ईशाच्या कुटुंबीयांना आपल्या मुलीचा हा निर्णय तितकासा रुचला नाही; परंतु जसजसे तिने एक-एक शिखर पादाक्रांत केले, तसे तेदेखील तिच्या पाठीशी भक्कम उभे राहिले. ‘मी जे करतेय त्यासाठी प्रामाणिक परिश्रम घेते आणि मला त्याचे चांगले परिणाम मिळत आहेत, हे पाहून माझ्या आई-वडिलांनी मला प्रोत्साहन दिले,’ असे ती म्हणाली. ईशाने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मुलींना या क्षेत्रात योग्य मार्गदर्शन देण्यासाठी ईशाने प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. तिचे यश पाहून अनेक मुली आता स्वत:च्या नव्या वाटा शोधत आहेत.
मुलींना त्यांच्या मनासारखे करिअर करण्यासाठी ती सांगते, मुलींनी स्वत:वर दडपण न बाळगता स्वत:च्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत. लग्न करून स्थायिक होणे, एवढाच आपल्या आयुष्याचा उद्देश नाही. भविष्य हे महिला शक्तीचे आहे.