रंगला नाट्याविष्काराचा तरुण सोहळा!
By Admin | Updated: September 4, 2014 00:51 IST2014-09-04T00:25:21+5:302014-09-04T00:51:57+5:30
स.भु. महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाचा ‘पेज टू स्टेज’ एकांकिका महोत्सव बुधवारी उत्तरोत्तर रंगत गेला. यंदा महोत्सवाचे दुसरे वर्ष होते.

रंगला नाट्याविष्काराचा तरुण सोहळा!
औरंगाबाद : चेहऱ्यावर मेकअप चढवत खुलणारे, आरशात स्वत:चंच बदललेलं रूप पाहत हरखणारे चेहरे, आत कुठेतरी हुरहुर लागलेली असतानाच सहकलाकाराच्या पाठीवर मारलेली थाप, गुरूला पाहताच नकळत वाकलेल्या माना, नटराजासमोर मंद दरवळणारा धूप... आणि अवचित वाजलेल्या तिसऱ्या घंटेच्या पार्श्वसंगीतासह वर गेलेला पडदा... स.भु. महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाचा ‘पेज टू स्टेज’ एकांकिका महोत्सव बुधवारी उत्तरोत्तर रंगत गेला. यंदा महोत्सवाचे दुसरे वर्ष होते.
नाट्यशास्त्राचा अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभिनयासह लेखन, दिग्दर्शन, प्रकाशयोजना, नेपथ्य अशा सर्वच आघाड्या समर्थपणे सांभाळत तीन एकांकिकांचे सादरीकरण केले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. श्रीरंग देशपांडे, प्राचार्य डॉ. जगदीश खैरनार, उपप्राचार्य एस. एन. ठोंबरे उपस्थित होते. बालनाट्य चळवळीतील कार्यकर्ते रमाकांत मुळे, सुधीर देवगावकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
देशपांडे म्हणाले, ‘सरस्वती भुवन संस्था शताब्दी वर्षात पदार्पण करते आहे. त्या औचित्याने येत्या काळात संस्था शालेय विद्यार्थ्यांसाठी संस्कृत नाट्य महोत्सव, बालनाट्य स्पर्धा व आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धाही आयोजित करणार आहे.’ प्रा. किशोर शिरसाठ म्हणाले, ‘विद्यार्थ्याने नाट्यशास्त्राचे धडे केवळ पुस्तकातून न गिरवता त्याचे प्रात्यक्षिकही करावे यासाठी हा विद्यार्थीकेंद्री महोत्सव आम्ही सुरू केला. यातूनच उद्या नवे लेखक, अभिनेते घडतील, असा आम्हाला विश्वास वाटतो.’
मानसिक संतुलन गमावलेल्या आईचा अकाली प्रौढ झालेला समजूतदार मुलगा, त्यांच्यातील गहिऱ्या नात्याचे हळवे दर्शन संतोष गायकवाड याच्या ‘पुन्हा एकदा’ या एकांकिकेने घडविले. अनेक प्रसंगांमध्ये भावुक होत रसिकांनी डोळ्याला रुमाल लावले. वर्तमानातील राजकीय-सामाजिक वास्तवावर सादर केलेल्या प्रवीण पारधे याच्या ‘देव तुझं भलं करो’ या उपरोधी विनोदीनाट्याने रसिकांना मनसोक्त हसवले, तर भाऊसाहेब सोनावणे याने लिहिलेल्या ‘दुभंग’ या प्रेमभंगाच्या कथेने नि:शब्द केले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रा. योगिता महाजन, प्रा. नितीन गरुड व डॉ. गणेश शिंदे यांनी परिश्रम घेतले.