छत्रपती संभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील डॉ. अशोक गुरूप्पा बंडगर व त्यांच्या पत्नी पल्लवी यांची एका विद्यार्थिनीवरील अत्याचाराच्या आरोपातून अतिरिक्त सत्र न्यायाधीश ऋचा खेडेकर यांनी निर्दोष सुटका केली. विद्यार्थिनीने बंडगर दाम्पत्याविरोधात अत्याचार, लैंगिक शोषण, मानसिक छळ व धमकी दिल्याचे गंभीर आरोप केले होते.
काय होती तक्रार?विद्यार्थिनीने एम.पी.ए. (मास्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स) अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता. २०१९ ते २०२१ या कालावधीत ती शिक्षण घेत असताना तिने तिसऱ्या सत्रात ‘नाट्यशास्त्र’ हा विषय निवडला आणि ऑनलाइन वर्गांद्वारे डॉ. अशोक बंडगर यांच्याशी ओळख झाली. चौथ्या सत्रात संशोधनासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी तिचा अधिक संपर्क वाढला. ११ फेब्रुवारी २०२२ रोजी ती छत्रपती संभाजीनगरला आली असता हॉस्टेल उपलब्ध नसल्यामुळे डॉ. बंडगर दाम्पत्याने तिला त्यांच्या घरी राहण्यास सांगितले. पुढे ती जवळपास एक वर्ष त्यांच्या घरी वास्तव्यास होती. डॉ. बंडगर यांनी वेळोवेळी अत्त्याचार केल्याचा आणि त्यांच्या पत्नीने मानसिक छळ केल्याचा, मुलगा हवाय असे सांगून दबाव टाकल्याचा आणि शारीरिक अत्याचारात सहभागी झाल्याचा आरोप पत्नीवर केला होता. या घटनांची माहिती तिने ११ फेब्रुवारी २०२३ रोजी घरी परतल्यानंतर वडिलांना दिली. त्यानंतर २५ एप्रिल २०२३ रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता.
कोर्टाने केली निर्दोष मुक्ततापीडितेचा स्वेच्छेने आरोपीच्या घरी राहण्याचा निर्णय. तक्रारीत ७० दिवसांचा विलंब आणि त्याचे समाधानकारक स्पष्टीकरण नसणे. पीडितेच्या साक्षींमधील विरोधाभास, आणि तिच्या वडिलांची साक्षही सुसंगत नसणे. घटनास्थळी घरात इतर सदस्य सतत उपस्थित असतानाही अत्याचार होणे अशक्यप्राय वाटते. वैद्यकीय आणि फॉरेन्सिक तपासणीत बलात्काराचे स्पष्ट पुरावे आढळले नाहीत. तक्रारी मागे हेतूपुरस्सर उद्देश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मुद्द्यांचा उल्लेख करीत न्यायालयाने बंडगर दाम्पत्याची कलम ३७६(२)(एन), १०९, ११४, ५०४, ५०६ सह ३४ नुसार दाखल आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.