डॉ़ आंबेडकर विचार संमेलन २५ ला नांदेडात
By Admin | Updated: June 18, 2017 00:11 IST2017-06-18T00:03:53+5:302017-06-18T00:11:40+5:30
नांदेड :प्रगतशील लेखक संघ, मौर्य प्रतिष्ठान व उद्याचा मराठवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने ५ वे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन २५ जून रोजी आयोजित करण्यात आहे़

डॉ़ आंबेडकर विचार संमेलन २५ ला नांदेडात
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : प्रगतशील लेखक संघ, मौर्य प्रतिष्ठान व उद्याचा मराठवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने ५ वे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन २५ जून रोजी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आल्याची माहिती समन्वयक नयन बारहाते, प्रा़ यशपाल भिंगे यांनी आज पत्रपरिषदेत दिली़
समाजाला संविधानसाक्षर करणे, संवैधानिक नैतिकतेचा डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचा दृष्टिकोन प्रतिष्ठित करणे आणि सर्व समविचारी प्रागतिक तत्त्वांचा समन्वय घडवून आणणे, या उद्दिष्टपूर्तीसाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे नयन बारहाते यांनी सांगितले़
या साहित्य संमेलनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचे ‘सामाजिक न्यायात एनजीओची भूमिका: भ्रम आणि वास्तव’ या विषयावरील बीजभाषणाने होणार आहे़ याप्रसंगी महापौर शैलजा स्वामी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे़
दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री कुमार केतकर, प्रा़ डॉ़ प्रज्ञा दया पवार, पत्रकार संजय आवटे यांचे व्याख्यान तर डॉ़ भालचंद्र कांगो हे शेतकरी, श्रमिक आणि सामाजिक न्याय या विषयावर श्रोत्यांशी संवाद साधतील़ समारोपात विचारवंत प्रा़ डॉ़ बजरंग बिहारी तिवारी यांचे व्याख्यान होणार आहे़ अध्यक्षस्थानी साहित्यिक उत्तम कांबळे हे राहणार आहेत़
पत्रपरिषदेस कॉ़ फारूख अहमद, संमेलनाचे कार्यवाह राम शेवडीकर, प्रा़ डॉ़ केशव सखाराम देशमुख, डॉ़ पी़ विठ्ठल, कॉ़ प्रदीप नागापूरकर यांची उपस्थिती होती़