डीपीडीसी बैठक वादळी ठरणार
By Admin | Updated: June 16, 2016 00:06 IST2016-06-15T23:57:19+5:302016-06-16T00:06:22+5:30
जालना : मर्जीतील लोकांच्या कामांना मंजुरी दिली जात असून, सदस्य असतानाही आपल्या कामाला मंजुरी मिळत नसल्याने जिल्हा नियोजन

डीपीडीसी बैठक वादळी ठरणार
जालना : मर्जीतील लोकांच्या कामांना मंजुरी दिली जात असून, सदस्य असतानाही आपल्या कामाला मंजुरी मिळत नसल्याने जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. जिल्हा नियोजन समितीची गुरुवारी होणारी बैठक वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा नियोजन समितीने तयार केलेल्या १९० कोटी ८२ लाखांच्या आराखड्यास राज्यस्तरीय समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे. गुरुवारी होणाऱ्या नियोजन समितीच्या बैठकीत मार्च अखेर झालेल्या खर्चाचा आढावा २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या मंजूर झालेल्या आराखड्याचे सादरीकरण केले जाणार आहे. तसेच मागील आराखड्यास मंजुरी देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीमध्ये जवळपास २२ सदस्य आहेत. या सदस्यांना डावलून मर्जीतील काही व्यक्तींच्या कामानाच मंजुरी दिली जात असल्याचा आरोप सदस्यांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी होणाऱ्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका काही सदस्यांनी घेतली आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या अख्त्यारित असलेल्या अनेक विषयांच्या खर्चाला मंजुरी मिळाली आहे. मात्र, तो किती खर्च झाला आणि त्या कामांची गुणवत्ता काय, याबाबत सदस्यांतूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (प्रतिनिधी)
गेल्या वर्षभरापासून जिल्हा नियोजन समितीचा कारभार समाधानकारक नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यातच अनेक सदस्यांमध्ये कामांबाबतही नाराजी पसरलेली आहे. अशात सदस्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना कामे कशी दिली जातात, असा संतप्त सवाल सदस्यांतून उपस्थित केला जात आहे.
४पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आमदारांसह सदस्यांची असलेली नाराजी दूर करण्यात त्यांना कितपत यश येते, हे पाहणी औत्सुक्याचे ठरेल. एकूणच आज होणाऱ्या या बैठकीत काय निर्णय होतो, याची उत्सुकता आहे.