औंढ्यातील दलित वस्तीमध्ये दगडफेक
By Admin | Updated: August 19, 2014 02:07 IST2014-08-19T01:24:13+5:302014-08-19T02:07:55+5:30
औंढा नागनाथ : येथील दलित वस्तीमध्ये मागील पाच दिवसांपासून दिवसा व रात्रीच्या वेळी अचानकपणे दगड फेकत आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

औंढ्यातील दलित वस्तीमध्ये दगडफेक
औंढा नागनाथ : येथील दलित वस्तीमध्ये मागील पाच दिवसांपासून दिवसा व रात्रीच्या वेळी अचानकपणे दगड फेकत आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून याबाबत पोलिसांच्या वतीनेसुद्धा पाहणी करण्यात आली. नेमके कोठून दगड फेकल्या जातात याचा शोध अद्याप लागलेला नाही.
औंढा येथील सिद्धार्थनगरमध्ये दलित वस्तीमध्ये सकाळपासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत अर्धा किलो वजनाचे दगड अचानक घरांवर, छतावर व अंगणामध्ये पडत आहेत. त्यामुळे वृद्ध व मुलांना घराच्या बाहेर पडणे म्हणजेच जीव धोक्यात घालण्यासारखे झाले आहे. गुरूवारपासून सतत दगडाचा पाऊस पडत असून सोमवारी या घटनेचा पाचवा दिवस होता. या भागातील नागनाथ मुळे, सुमेध मुळे, अरविंद मुळे, प्रकाश मुळे, सदानंद मुळे, मोहन गव्हाणे, करण ढगे यांनी या घटनेची माहिती पोनि लक्ष्मण केंद्रे यांना दिली.
त्यांनी सपोनि ज्ञानोबा पुरी यांच्यासोबत शनिवारी या भागाला भेट दिली. घडत असलेल्या प्रकाराची पाहणी केली. कोणत्या दिशेने दगडाचा मारा केला जातो, याचा थांगपत्ता अद्याप त्यांना लागलेला नाही. या वस्तीमध्ये अंधार असतो त्यामुळे या वस्तीत पथदिव्यांची मागणी केल्या जात आहे. रात्रीच नव्हे, तर दिवसाही हा प्रकार घडत असल्याने या मागचा सूत्रधार शोधण्याची गरज आहे. (वार्ताहर)