शहर वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा !

By Admin | Updated: September 6, 2015 23:55 IST2015-09-06T23:45:24+5:302015-09-06T23:55:20+5:30

उस्मानाबाद : शहरातील मुख्य मार्गांसह बाजारपेठेच्या परिसरात वाढलेले अतिक्रमण, रस्त्यावर उभी राहणारी वाहने, वाहनांसाठी पार्किंगची नसलेली सोय आदी

The downfall of the city traffic system! | शहर वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा !

शहर वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा !


उस्मानाबाद : शहरातील मुख्य मार्गांसह बाजारपेठेच्या परिसरात वाढलेले अतिक्रमण, रस्त्यावर उभी राहणारी वाहने, वाहनांसाठी पार्किंगची नसलेली सोय आदी कारणांमुळे वाहतूक व्यवस्थेचा पूर्णत: बोऱ्या वाजला आहे़ वेळोवेळी कारवाई करण्याकडे पोलीस प्रशासनाचे तर अतिक्रमण हटविण्यासह इतर उपाययोजना करून देण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे़ या दोन्ही विभागाच्या दुर्लक्षामुळे मात्र, शहरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे़
उस्मानाबाद शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौक, जिजाऊ चौक, क्रांतीवीर लहूजी साळवे चौक, बसवेश्वर चौक परिसरात पालिकेकडून अर्धा कोटी रूपये खर्च करून वाहतूक सिग्नल बसविण्यात आले आहेत़ मात्र, सतत बंद पडणाऱ्या वाहतूक सिग्नलमुळे कोट्यवधीचा खर्च मातीत जात असल्याचे दिसत आहे़
याशिवाय तेरणा महाविद्यालय ते आयुर्वेदिक महाविद्यालय, जिल्हाधिकारी निवासस्थान ते देशपांडे बसथांबा, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौक -समता नगर मधून आनंद नगरकडे जाणारा रस्ता, जिल्हा न्यायालय परिसरासह शहरातील बार्शी बायपासवर अनेक ठिकाणी अतिक्रमणात वाढ झाली आहे़ मुख्य मार्गावर अर्ध्या रस्त्यावर वाहने उभा करण्यात येत असल्याने वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे़ विशेष म्हणजे अनेक अवजड वाहने भरदिवसाही शहरातील मुख्य बाजारपेठेत फिरत असल्याने सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढली आहे़ परिणामी अपघातात वाढ झाली असून, सर्वसामान्यांना पायी चालणेही मुश्किल होवून बसले आहे़ शहरातील बार्शी बायपास मार्गावरील ‘एच़पी़’ गॅस एजन्सीसमोर शनिवारी सकाळी पत्रकार राम खटके यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला़ हा अपघात होतो न होतो तोच खडबडून जागे झालेल्या वाहतूक शाखेने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ तीन विशेष पथके आणि दस्तुरखुद्द वाहतूक शाखेचे पोनि एस़बी़मानोर यांचे पथक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू केली़ दिवसभरात ट्रीपलशीट, वाहनपरवाना नसणे, वाहतुकीस अडथळा करणाऱ्या ९९ वाहनांवर कारवाई करून १० हजार ७०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला़ तर इतर ३७ वाहनांवर कारवाई करून ३७०० रूपये दंड वसूल केला़ दिवसभरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या अशा एकूण १३६ वाहनांवर कारवाई करून १४४०० रूपयांचा दंड वसूल केला़
वाहतूक शाखेत एका पोलीस निरीक्षकांसह २८ कर्मचारी कार्यरत आहेत़ पाच पॉइंटवर प्रत्येकी दोन प्रमाणे दहा कर्मचारी कार्यरत राहतात़ दोन शिफ्टमध्ये २० कर्मचारी कार्यरत राहतात़ तर उर्वरितांपैकी काहींना कार्यालयीन कामकाज तर काहीजण सुटवर जातात़ त्यामुळे हे फिक्स पॉइंट वगळता अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे इतरत्रची वाहतूक सुरळीत करण्याकडे किंवा वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांवर कारवाई करण्यास वाहतूक शाखाही अपयशी ठरत आहे़
(प्रतिनिधी)

Web Title: The downfall of the city traffic system!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.