मुस्लिम आरक्षणासाठी धरणे आंदोलन
By Admin | Updated: October 19, 2016 01:08 IST2016-10-19T00:53:57+5:302016-10-19T01:08:59+5:30
औरंगाबाद : मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी जमियत-ए-उलेमा हिंदतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले.

मुस्लिम आरक्षणासाठी धरणे आंदोलन
औरंगाबाद : मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी जमियत-ए-उलेमा हिंदतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाने मुस्लिम समाजाला त्वरित न्याय न दिल्यास आरक्षण आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
जमियत-ए-उलेमा हिंदने आठ दिवसांपूर्वीच मुस्लिम आरक्षणासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. शहरात जनजागृतीसाठी ठिकठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात आले होते. मंगळवारी दुपारी धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सामील झाले. या आंदोलनाला विविध पक्ष, संघटनांनीही पाठिंबा दर्शविला. धरणे आंदोलनात शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत मार्गदर्शनही केले. एका शिष्टमंडळाद्वारे विभागीय आयुक्तांना निवेदनही सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद केले की, मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण द्यावे, अशी शिफारस सच्चर आणि रंगनाथ मिश्रा समितीने केली आहे. राज्य शासनाने नेमलेल्या महेमूद-ऊर-रहेमान समितीनेही आरक्षणाचे समर्थन केलेले आहे. यापूर्वी शासनाने मुस्लिम समाजाला आणि मराठा समाजाला आरक्षण दिले होते. उच्च न्यायालयानेही मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण देण्याचा आदेश दिला आहे. यानंतरही शासन याची अंमलबजावणी करण्यास तयार नाही. शासनाची ही भूमिका अत्यंत अन्यायकारक असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. शासनाने त्वरित आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास आरक्षण आंदोलन आणखी तीव्र करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. धरणे आंदोलनात जमियत-ए-उलेमा हिंदचे प्रदेशाध्यक्ष मौलाना हाफीज नदीम सिद्दीकी, शहराध्यक्ष खलील खान, उब्दुल रऊफ, मौलाना अब्दुल रशीद मदनी, मौलाना मुस्तकीम, मौलाना शेख अब्दुल खुद्दूस मिल्ली, मौलाना अब्दुल सत्तार, मौलाना अब्दुल रहीम मिल्ली, हाफीज अब्दुल्लाह, मौलाना मोहंमद युसूफ, हाफीज शेख सिकंदर, नगरसेवक अब्दुल नवीद, अय्युब खान, जमीर कादरी, माजी नगरसेवक मोहसीन अहेमद, मीर हिदायत अली, रमजानी खान, खालेद पठाण, मश्शू , फिरोज खान, मौलाना अहमद खान नदवी, मुफ्ती जाकीर कास्मी आदींची प्रमुख उपस्थिती होती.