गुणांवर विद्यार्थ्यांना शंका; मित्र-मैत्रिणींच्या गुणांशी तुलना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:06 IST2021-08-21T04:06:02+5:302021-08-21T04:06:02+5:30
औरंगाबाद : माझा पाल्य हुशार होता. नववीत चांगले गुण होते. तरी दहावीत मित्र, मैत्रिणींपेक्षा कमी गुण कसे, काहीतरी चूक ...

गुणांवर विद्यार्थ्यांना शंका; मित्र-मैत्रिणींच्या गुणांशी तुलना
औरंगाबाद : माझा पाल्य हुशार होता. नववीत चांगले गुण होते. तरी दहावीत मित्र, मैत्रिणींपेक्षा कमी गुण कसे, काहीतरी चूक झाली असावी, अशा शंका वजा तक्रारी विभागीय शिक्षण मंडळाकडे येत आहेत. मूल्यांकन शाळांनी करून बोर्डाकडे दिले. त्यामुळे गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकनाची सुविधा नसल्याचे बोर्डाने निकालावेळी स्पष्ट केले होते. तरी विद्यार्थी पालकांतून तक्रारींचा ओघ सुरूच आहे.
दहावी आणि बारावीचा मूल्यांकनावर आधारित निकाल राज्य मंडळाने जाहीर केला. त्यात पुनर्मूल्यांकनाची सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात आलेली नाही; परंतु काही त्रुटी अथवा आक्षेप असल्यास विद्यार्थ्यांनी ते नोंदवावेत, असे राज्य मंडळाने कळवले होते. त्यानुसार विभागीय शिक्षण मंडळाकडे १५ ते २० तक्रारी आल्या असून, त्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी मित्र-मैत्रिणींत तुलना करून गुण कमी असल्याची शंका वजा तक्रारी आहेत. त्या विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे समुपदेशन विभागीय शिक्षण मंडळाकडून करण्यात येत आहे. यावर्षी बोर्डाची परीक्षा झाली नाही. विद्यार्थी ज्या शाळा, महाविद्यालयात शिकले. त्याच शाळांनी ठरवून दिलेल्या निकषांआधारे मूल्यांकन करून ते बोर्डाकडे ऑनलाइन भरले. त्या आधारे बोर्डाने निकाल जाहीर केला. त्या गुणांमध्ये शिक्षण मंडळाचा कोणताही हस्तक्षेप नाही, असे विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी सांगितले.