खासगी डॉक्टरांच्या घरी काम करणाऱ्यांना डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:22 IST2021-02-05T04:22:28+5:302021-02-05T04:22:28+5:30
औरंगाबाद : देशभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. मात्र, शहरात आरोग्य ...

खासगी डॉक्टरांच्या घरी काम करणाऱ्यांना डोस
औरंगाबाद : देशभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. मात्र, शहरात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नावाखाली खासगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या घरी काम करणाऱ्या व्यक्तींना कोरोना योद्धा दाखवून लस देण्यात येत असल्याचा धक्कादाक प्रकार समोर आला आहे.
जिल्ह्यात जवळपास ३३ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली, परंतु यात रुग्णसेवेशी संबंध नसलेल्या लोकांचीही नोंदणी झाल्याचे दिसते. शहरातील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरकडे घरी काम करणाऱ्या व्यक्तीला डोस देण्यात आला. लसीकरणासाठी नोंदणी करताना त्यांना रुग्णालयाचे कर्मचारी म्हणून नोंदणी केली. या प्रकाराची महापालिकेनेही गांभीर्याने दखल घेऊन संपूर्ण पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
खासगी डॉक्टरांच्या घरी काम करणाऱ्या चालक, मोलकरीण यांच्यासह डॉक्टरांच्या संपर्कातील ‘सीए’कडे काम करणाऱ्या व्यक्तींनाही गेल्या काही दिवसांत लस देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे, परंतु याविषयी आरोग्य यंत्रणेला काहीही कल्पना नाही.
रुग्णालयांनी दिलेल्या यादीवर डोळे झाकून विश्वास
प्रत्येक रुग्णालयाकडून कर्मचाऱ्यांची यादी देण्यात आली, परंतु यादीतील कर्मचारी आरोग्यसेवेशी संबंधित आहे का, याची पडताळणी करण्यात आलेली नाही. त्यातूनच असे प्रकार होण्याची शक्यता आहे.
असा आहे प्रकार
पुंडलिकनगर परिसरातील गाडे हॉस्पिटलमधील डॉक्टरच्या घरी काम करणाऱ्या एका व्यक्तीला लस देण्यात आल्याचे एका व्हिडीओवरून समोर आले आहे. डॉक्टर जे सांगेल, ते काम करीत असल्याचे या कर्मचाऱ्याने या व्हिडीओत सांगितले. या व्यक्तीने नंतर रुग्णालयातही काम करीत असल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, परंतु सदर व्यक्ती रुग्णालयात काम करत नसल्याचे रुग्णालयातील अन्य कर्मचाऱ्यांनी सांगितले. या संदर्भात रुग्णालयाचे डॉ.यशवंत गाडे यांच्याशी वारंवार संपर्क साधला, परंतु त्यांनी फोन घेतला नाही. रुग्णालयातील कर्मचारी, चालक, मावशी, वॉचमन, अकाउंट्सचे कर्मचारी यांना लस देण्यास परवानगी आहे, हा काही गुन्हा नाही, असे मेसेजद्वारे डॉ.गाडे उत्तर दिले.
कारवाई केली जाईल
ज्या लाभार्थ्यांचे नाव को-विन अॅपवर नोंदविण्यात आले आहे, त्यांनाच डोस दिला जात आहे. खासगी रुग्णालयांकडून लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांची देण्यात आली. दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवून नोंदणी करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचारी सोडून जर इतर कोणाला लस दिल्याचा प्रकार झाला असेल, तर कारवाई केली जाईल.
- डॉ.नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा