प्रसाधनगृहांची केंद्रीय पथकाकडून पहाणी
By Admin | Updated: July 12, 2015 00:43 IST2015-07-12T00:43:38+5:302015-07-12T00:43:38+5:30
कळंब : प्राथमिक शाळेत स्वच्छतागृह आहेत का? त्याचा नियमित वापर केला जातो का? आदी बाबींची पडताळणी करण्यासाठी केंद्रीय उपसचिव सुरज सिंग

प्रसाधनगृहांची केंद्रीय पथकाकडून पहाणी
कळंब : प्राथमिक शाळेत स्वच्छतागृह आहेत का? त्याचा नियमित वापर केला जातो का? आदी बाबींची पडताळणी करण्यासाठी केंद्रीय उपसचिव सुरज सिंग हे शनिवारी कळंब तालुक्यात आले होते. यावेळी त्यांनी तालुक्यातील तीन शाळांची तपासणी केली. अचानक आलेल्या या एक सदस्यीय पथकामुळे मात्र शनिवार असतानाही तालुक्यातील प्राथमिक शाळा पूर्णवेळ चालवाव्या लागल्या.
सर्व शिक्षा अभियानासह राज्यातील प्राथमिक शिक्षणातील विविध उपक्रमासाठी केंद्र सरकारही मोठा निधी खर्च करते. यातूनच बहुसंख्य शाळेत मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात आली आहेत. यासाठी मोठा खर्च करण्यात आला आहे. हा खर्च सत्कारणी लागला आहे का? यासह संबंधित विविध मुद्यांची तपासणी करण्यासाठी शनिवारी केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाचे उपसचिव सुरज सिंग हे कळंब तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी शिवाजी जाधव, कार्यकारी अभियंता एस.व्ही. वाकुरे, गटशिक्षणाधिकारी सी.एस. गावडे, शाखा अभियंता एस.टी. गरड, आर.टी. राऊत आदी उपस्थित होते. या पथकाने कळंब तालुक्यातील जाधववाडी, जवळा (खुर्द), गोविंदपूर या शाळांना भेटी देवून पाहणी केली.
केंद्रीय उपसचिवांचा दौरा अचानक माहित झाला होता. शिवाय हे नेमक्या कोणत्या शाळेला भेट देणार आहेत. याबाबत गोपनियता होती. यामुळे तालुक्यातील सर्वच प्राथमिक व माध्यमिक शाळातील गुरुजी दिवसभर ‘अटेंशन’ मध्ये होते. बहुतांश शाळातील शौचालयांची अवस्था बिकट आहे. त्यामुळे या पथकांची गुरुजींनी चांगलीच धास्ती घेतली होती.
केंद्रीय उपसचिव सुरज सिंग यांनी जाधववाडी येथील स्वच्छतागृहाला जागा अपुरी असल्याचे निदर्शनास आणून दिले. याशिवाय शौचालयातील फुटलेले भांडे बदलण्यासह किरकोळ दुरुस्तीच्या सुचना दिल्या. गोविंदपूर येथेही पाण्याची मुख्य अडचण असल्याने पाण्याची उपलब्धता करावी, किचनशेडमध्ये जळाऊ लाकडे ठेवू नयेत, अशी सूचना केली.