आधारकार्ड घेतल्याशिवाय भंगार खरेदी करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:30 IST2020-12-17T04:30:52+5:302020-12-17T04:30:52+5:30

औरंगाबाद : दुकानात विक्रीसाठी आलेले भंगार चोरीचे असू शकते, यामुळे भंगार विक्रीसाठी आणणाऱ्यांकडून आधारकार्डची सत्यप्रत घ्यावी. दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे ...

Don't buy scrap without taking Aadhaar card | आधारकार्ड घेतल्याशिवाय भंगार खरेदी करू नका

आधारकार्ड घेतल्याशिवाय भंगार खरेदी करू नका

औरंगाबाद : दुकानात विक्रीसाठी आलेले भंगार चोरीचे असू शकते, यामुळे भंगार विक्रीसाठी आणणाऱ्यांकडून आधारकार्डची सत्यप्रत घ्यावी. दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, महावितरणच्या तारा आणि वाहन भंगारात खरेदी करण्यापूर्वी आरटीओने ते भंगारात काढल्याची खात्री करावी, असे आदेश विशेष शाखेचे सहायक आयुक्त अशोक बनकर यांनी भंगार व्यावसायिकांना दिले.

गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहन चोऱ्या वाढल्या आहेत. चोरीच्या दुचाकी आणि अन्य वाहनांचे सुटे भाग करून चोरटे भंगारात विक्री करतात. महावितरणच्या ॲल्युमिनियमच्या वीज तारा चोरी करून भंगारात विक्री केल्या जात आहेत. ही बाब लक्षात घेऊन विशेष शाखेतर्फे आज पोलीस आयुक्त कार्यालयात भंगार व्यावसायिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ६० ते ७० भंगार व्यावसायिक उपस्थित होते. भंगार व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानावर माल घेऊन येणाऱ्या व्यक्तीची नोंद ठेवावी, त्याचे आधारकार्ड घ्यावे, शिवाय दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. संशयित माल घेऊन आलेल्या लोकांची माहिती तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याला कळवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा यावेळी एसीपी बनकर यांनी दिला. पोलीस निरीक्षक कठाने यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला.

Web Title: Don't buy scrap without taking Aadhaar card