‘भीक नको; पण कुत्रे आवर’, म्हणण्याची रुग्णालयावर वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:05 IST2021-05-18T04:05:17+5:302021-05-18T04:05:17+5:30
औरंगाबाद : पीएम केअर फंडातील ३१ व्हेंटिलेटर शहरातील ४ खासगी रुग्णालयांना देण्यात आले आहेत. मात्र, एकाही रुग्णालयात हे व्हेंटिलेटर ...

‘भीक नको; पण कुत्रे आवर’, म्हणण्याची रुग्णालयावर वेळ
औरंगाबाद : पीएम केअर फंडातील ३१ व्हेंटिलेटर शहरातील ४ खासगी रुग्णालयांना देण्यात आले आहेत. मात्र, एकाही रुग्णालयात हे व्हेंटिलेटर रुग्णांसाठी चालू शकले नाही. खासगी रुग्णालयांनी यासंदर्भात माहिती दिल्याचे घाटी प्रशासनातर्फे सांगण्यात आले. केंद्रांकडून आलेल्या या व्हेंटिलेटरविषयी काय भूमिका घ्यावी, अशी अडचण खासगी रुग्णालयांना सतावत असून, ‘भीक नको; पण कुत्रे आवर’, अशी त्यांची अवस्था झाली आहे.
खासगी रुग्णालयांना व्हेंटिलेटर मिळाल्याने रुग्णसेवेत वाढ होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, व्हेंटिलेटर मिळाल्यानंतर ते कार्यान्वित करण्यासाठी पत्रव्यवहाराचा खटाटोप करण्याची वेळ खासगी रुग्णालयांवरही आली. खासगी रुग्णालयांकडे ३१ व्हेंटिलेटर आहेत. इतर चार जिल्ह्यांना ५५ व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. घाटीत ६४ व्हेंटिलेटर आहेत. यात ४७ व्हेंटिलेटर खाेक्यात बंद असून, १७ व्हेंटिलेटर कंपनीच्या इंजिनिअर्सकडून दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्हेंटिलेटर प्राप्त झाल्यापासून इंजिनिअर्सच्या उपस्थितीतच व्हेंटिलेटर लावले जात आहे. खासगी रुग्णालयांतही व्हेंटिलेटर चालत नसून, यासंदर्भात मंगळवारी रुग्णालयांकडून लेखी अहवाल मिळणार आहे, अशी माहिती घाटी प्रशासनातर्फे देण्यात आली.
खासगी रुग्णालयांचीही अडचण
केंद्राचे व्हेंटिलेटर असल्याने त्याविषयी काही निर्णय घेणे खासगी रुग्णालयांनाही अवघड होत आहे. हे व्हेंटिलेटर परत करण्याचा विचार खासगी रुग्णालयांकडून सुरू आहे. परंतु, असे केले तर काय होईल, याचाही विचार केला जात असल्याचे समजते.