विठ्ठलसाई मंदिरातील दानपेट्या पळविल्या
By Admin | Updated: January 12, 2015 14:16 IST2015-01-12T14:15:01+5:302015-01-12T14:16:06+5:30
लोहारा तालुक्यातील दस्तापूर नजीक रस्त्याच्या कडेला असलेल्या विठ्ठलसाई मंदिरातील दोन दानपेट्या चोरट्यांनी लंपास केल्या.

विठ्ठलसाई मंदिरातील दानपेट्या पळविल्या
येणेगूर : लोहारा तालुक्यातील दस्तापूर नजीक रस्त्याच्या कडेला असलेल्या विठ्ठलसाई मंदिरातील दोन दानपेट्या चोरट्यांनी लंपास केल्या. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली असून, मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार, तुगाव येथील दिलीप माने यांनी दस्तापूर नजीकच्या शिवारात विठ्ठलसाई मंदीराची उभारणी केली आहे. या मंदिराच्या बाजूला महामार्गअसल्याने अनेक भाविक येथे दर्शनासाठी थांबतात. मंदिराचे पुजारी दिनकर पंडीत आचार्य (रा.निटूर ह.मु. दस्तापूर) हे शनिवारी नित्योपचार पूजा झाल्यानंतर दानपेट्या गाभार्यात ठेवून कुलूप लावून घराकडे गेले होते. दिनकर आचार्य हे रविवारी सकाळी मंदिरात आले असता गाभार्याचा कडीकोंडा तोडून दानपेट्या चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले. या घटनेची माहिती मिळताच मुरूम पोलीस ठाण्याचे सपोनि विलास गोबाडे, पोउपनि मनोज जिरगे, पोहेकॉगोरोबा कदम, मनोज जगताप आदीनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा सुरू केला होता. पेट्यांचा शोध घेतला असता नजीकच्या उसाच्या फडात दोन्ही पेट्या फोडल्याच्या अवस्थेत आढळून आल्या असून, आतील रक्कम लंपास करण्यात आली आहे. पोलिसांनी दुपारी तपासासाठी सोलापूर येथील श्वान पथकास पाचरण केले केले असून, तपास सुरू असल्याचे सपोनि विलास गोबाडे यांनी सांगितले. या गुन्ह्याची मुरूम पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ गोरोबा कदम हे करीत आहेत. (वार्ताहर)