दानशूरांनी हातभार लावल्याने महिला पुन्हा चालू लागली
By Admin | Updated: December 22, 2014 00:11 IST2014-12-22T00:11:32+5:302014-12-22T00:11:32+5:30
औरंगाबाद : आजारामुळे दोन्ही पाय निकामी झाल्याने गुडघ्यापासून तिची हालचाल थांबली होती.

दानशूरांनी हातभार लावल्याने महिला पुन्हा चालू लागली
औरंगाबाद : आजारामुळे दोन्ही पाय निकामी झाल्याने गुडघ्यापासून तिची हालचाल थांबली होती. पतीच्या मृत्यूनंतर घरकाम करून दोन्ही मुलींचा सांभाळ करणाऱ्या ४७ वर्षीय विधवेच्या दोन्ही पायांचे गुडघे बदलण्याची महागडी शस्त्रक्रिया करण्यासाठी शहरातील दानशूर धावून आले. त्यांनी तिच्या महागड्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य खरेदी करून दिले. घाटीतील डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केल्याने आज ती आपली दिनचर्या स्वत: करू लागली आहे.
दोन्ही पायांच्या गुडघ्याच्या वाट्या (टोटल नी रिप्लेसमेंट) शस्त्रक्रिया करण्यासाठी खाजगी रुग्णालयात कमीत कमी दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो. शिवाय राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत या शस्त्रक्रियेचा समावेश नाही. त्यामुळे गरीब असो अथवा श्रीमंत रुग्ण त्यांना हा खर्च लागणारच असतो. त्यामुळे अनेक गरीब रुग्ण असे असतात की, ही शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांच्याकडे पैसेच नसल्याने ते गुडघेदुखीचा त्रास सहन करीत असतात. अशाच प्रकारचा त्रास शारदा राजेंद्र माने ही विधवा अनेक दिवसांपासून सहन करीत होती.
तिला नीट चालताही येत नसल्याने तिची दिनचर्याही मंदावली होती. एक महिन्यापूर्वी ती घाटीत दाखल झाली. तेव्हा आॅर्थोपेडिक विभागाचे प्रमुख डॉ. एम.बी. लिंगायत यांनी तिला तपासले. तेव्हा त्यांनी तिला दोन्ही गुडघ्यांच्या वाट्या बदलण्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी लागणारा खर्चही त्यांनी सांगितला. तेव्हा त्यांनी शस्त्रक्रियेसाठी तुम्हाला कोणताही खर्च येणार नाही. मात्र, त्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करण्याची विनंती केली. तिने स्वत:च्या अंगावरील दागिने विक्री केले. त्यानंतरही रक्कम कमी पडत असल्याचे ती राहत असलेल्या कॉलनीतील लोकांच्या लक्षात आले.
त्यांनीही सढळ हाताने मदत केल्याने १५ नोव्हेंबर रोजी तिच्या एका गुडघ्याची वाटी बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. तिच्या दुसऱ्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केल्याशिवाय तिचा हा त्रास कमी होणार नसल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले.
त्यानंतर त्यांनी ही बाब शहरातील दानशूर व्यक्तींशी संपर्क साधून त्यांना मदत करण्याचे आवाहन केले.