कर्तृत्ववान जावई गेल्याने अंबाजोगाईकर शोकमग्न

By Admin | Updated: June 6, 2014 01:03 IST2014-06-06T00:26:10+5:302014-06-06T01:03:38+5:30

अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाई केंद्रीय ग्रामविकासमंत्री तथा भाजपाचे जेष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे यांचे अंबाजोगाईशी अतिशय जिव्हाळ्याचे नाते़ मुंडे नात्याने अंबाजोगाईचे जावई़

Done by the graceful son-in-law, | कर्तृत्ववान जावई गेल्याने अंबाजोगाईकर शोकमग्न

कर्तृत्ववान जावई गेल्याने अंबाजोगाईकर शोकमग्न

अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाई
केंद्रीय ग्रामविकासमंत्री तथा भाजपाचे जेष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे यांचे अंबाजोगाईशी अतिशय जिव्हाळ्याचे नाते़ मुंडे नात्याने अंबाजोगाईचे जावई़ त्यांच्या कर्तृत्वाने अंबाजोगाईकरांची छाती अभिमानाने फुलायची; परंतु निधनाची वार्ता कानी पडल्यानंतर अंबानगरी शोकमग्न झाली़
गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय जीवनाचा प्रारंभ अंबाजोगाई शहरातून झाला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच मुंडे विद्यार्थी दशेतच विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून नेतृत्व करू लागले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वक्तृत्व कला विकसीत केली. प्राचार्य राजाभाऊ धाट, मा. मा. क्षीरसागर, वि. भा. देशपांडे अशा संघ कार्यकर्त्यांच्या संपर्कातून त्यांनी आपले नेतृत्व गुण विकसित केले. अंबाजोगाई ही माझी कर्मभूमी आहे हे ते सातत्याने सांगत. अंबाजोगाई तालुक्यातीलच उजनी जि. प. गटातून १९७८ मध्ये ते पहिल्यांदा निवडून गेले़ राज्याच्या राजकारणात उच्च पदावर पोहचले तरी त्यांनी आपल्या कर्मभूमीशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही.
महाविद्यालयीन जीवनात त्यांची ओळख प्रमोद महाजन यांच्याशी झाली. या मैत्रीचे रुपांतर पुढे नात्यात झाले. महाजन यांची बहीण प्रज्ञा यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला़ सासरवाडीवर मला एकतर्फी प्रेम करायला लावू नका अशी कोटीही ते सातत्याने आपल्या भाषणातून करीत असत़ तारूण्यातील बराच कालावधी त्यांनी या शहरात घालविला. त्यामुळे त्यांच्या आठवणींचे पट उघडून कार्यकर्ते व नागरिक अश्रू ढाळत आहेत.
योगेश्वरी देवीवर श्रद्धा
गोपीनाथ मुंडे हे योगेश्वरी देवीचे निस्सिम भक्त होते. त्यांनी नवरात्र महोत्सवात योगेश्वरी देवीचे दर्शन कधीही चुकवले नाही. दर आष्टमीला ते पत्नी प्रज्ञा मुंडे यांच्यासह देवीचे दर्शन घेत असत. देवीचे दागिने चोरीला गेल्यावर त्यांनी मदतफेरी काढली़ यातून साडे तीन लाख रुपये जमा झाले. त्यांनी स्वत: देवीला ३३ तोळ्याचे सोन्याचे दागिने अर्पण केले.

Web Title: Done by the graceful son-in-law,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.