डोलखेडा येथे अज्ञात रोग व पाण्याअभावी फळबागा धोक्यात
By Admin | Updated: May 22, 2017 00:13 IST2017-05-22T00:09:30+5:302017-05-22T00:13:10+5:30
टेंभूणी : जाफराबाद तालुक्यातील डोलखेडा खुर्द येथील शेतकरी कडूबा प्रल्हाद डोईफोडे व अन्य काही शेतकऱ्यांचे संत्रा बागांचे पाण्याअभावी व अज्ञात रोगामुळे मोठे नुकसान झाले

डोलखेडा येथे अज्ञात रोग व पाण्याअभावी फळबागा धोक्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभूणी : जाफराबाद तालुक्यातील डोलखेडा खुर्द येथील शेतकरी कडूबा प्रल्हाद डोईफोडे व अन्य काही शेतकऱ्यांचे संत्रा बागांचे पाण्याअभावी व अज्ञात रोगामुळे मोठे नुकसान झाले आहे. याकडे कृषी विभागाने लक्ष देऊन मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.
डोलखेडा येथील शेतकरी कडूबा प्रल्हाद डोईफोडे यांची सिनगाव जहागीर येथील शिवारात गट नंबर ३०८ या गटात संत्रा बाग सन २००४ मध्ये नागपूर संत्री या जातींच्या २७५ रोपांची लागवड केली होती. लागवडी नंतर या झाडाचे मोठे कष्ट घेऊन निगा राखली. ती बाग जोपासली होती. यासाठी त्यांनी दुष्काळात खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी विकत आणले होते. या संत्रा बागावर अज्ञात रोगामुळे ही संपूर्ण बाग जळत आहे.
यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज असताना टेंभूर्णी येथील कृषी विभागाचे कार्यालय कधी चालू कधी बंद अशी अवस्था आहे. त्यातच या कार्यालयात कर्मचारी दिसणे हे दुर्मीळ झाले आहेत. त्यातच या शेतकऱ्याचे गाव हे जाफराबाद तालुक्यात तर शेती ही मराठवाडा व विदभार्तील सीमारेषेवर आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला मार्गदर्शन व नुकसानीचे पंचनामे कोणी करायचे हा कळीचा मुद्दा होऊन बसल्याने या शेतकऱ्याची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे.
या शेतकऱ्याला कृषी विभागाने मार्गदर्शन करून तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नारायण डोईफोडे, गजानन डोईफोडे, संजय डोईफोडे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.