१ लाख विहिरींसह शेततळे करणार
By Admin | Updated: August 17, 2015 00:07 IST2015-08-17T00:07:37+5:302015-08-17T00:07:37+5:30
हिंगोली : राज्यात जलयुक्त शिवार अभियानाला चांगले यश मिळत आहे.

१ लाख विहिरींसह शेततळे करणार
हिंगोली : राज्यात जलयुक्त शिवार अभियानाला चांगले यश मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यामध्ये आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील धडक सिंचन विहिरींची कामे पूर्ण करणे, नव्याने एक लाख विहिरी व ५० हजार शेततळी निर्माण करण्याचा कार्यक्रम शासन राबविणार असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री तथा पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात शनिवारी सकाळी पालकमंत्री कांबळे यांच्या मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी हे बोलत होते. खा. राजीव सातव, जि.प.अध्यक्षा लक्ष्मीबाई यशवंते, आ.तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्षा अनिता सुर्यतळ, जिल्हाधिकारी तुकाराम कासार, पोलिस अधीक्षक कैलास कणसे, एसआरपीएफचे समादेशक सी. एस. बोईनवाड, प्रभारी सीइओ शिवाजी कपाळे, अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, मान्यवर नागरिक, विद्यार्थी, पालक, पत्रकार उपस्थित होते. पालकमंत्री कांबळे पुढे म्हणाले , २०१४-२०१५ या आर्थिक वर्षात नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या अल्प मुदत कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. जे शेतकरी या कर्जाचा वार्षिक हप्ता बँकेस विहित मुदतीत परत करील. अशा शेतकऱ्यांना कर्जावरील व्याज २०१५-१६ या वर्षात माफ करील. त्यापुढील चार वर्षाचे म्हणजेच २०१९-२०२० पर्यंतच्या वर्षाचे सहा टक्के दराने होणारे व्याज शासनातर्फे शेतकऱ्यांच्या वतीने संबंधीत बँकाना देण्याचा निर्णय शासनाने २९ जुलै रोजी घेतलेला असून त्यापोटी १ हजार ५२६ कोटी रुपये शासन खर्च करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नापिकीमुळे आत्महत्या करण्याच्या घटनेमध्ये वाढ होवू नये, यासाठी या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये ज्या कुटूंबाना लाभ मिळत नाही, अशा दारिद्र्य रेषेवरील एपीएल, केशरी शिधापरित्रिकाधारक शेतकऱ्यांना सुद्धा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या दराप्रमाणे म्हणजेच तांदूळ तीन रुपये व गहू दोन रुपये प्रति किलो या दराने वाटप करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून होत आहे. यामुळे १४ जिल्ह्यामध्ये सर्व शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्न सुरक्षेची हमी प्राप्त होणार आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातही कारवाडी येथून या योजनेचा प्रारंभ झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३ लाखापेक्षा अधिक एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले. ध्वजारोहणानंतर पोलिस पथकाने त्यांना मानवंदना दिली. सूत्रसंचालन प्रा. मदन मार्डीकर यांनी केले.