जुने कावसान गावात बिबट्याने पाडला कुत्र्यांचा फडशा
By Admin | Updated: December 16, 2015 00:19 IST2015-12-16T00:06:58+5:302015-12-16T00:19:06+5:30
पैठण : पैठण शहरालगत असलेल्या जुने कावसान या गावात सोमवारी (दि़१४) बिबट्याने दोन कुत्र्यांचा फडशा पाडला़ परिसरात बिबट्या अवतरल्याने भीतीचे वातावरण आहे़

जुने कावसान गावात बिबट्याने पाडला कुत्र्यांचा फडशा
पैठण : पैठण शहरालगत असलेल्या जुने कावसान या गावात सोमवारी (दि़१४) बिबट्याने दोन कुत्र्यांचा फडशा पाडला़ परिसरात बिबट्या अवतरल्याने नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे़ विशेष म्हणजे वन विभागाने बिबट्याच्या अस्तित्वाच्या पुराव्याचा पंचनामा करून सावधानतेचा इशारा दिला आहे़ बिबट्याच्या भीतीमुळे काही नागरिकांनी शेतात जाणे बंद केले.
सोमवारी रात्री ७.३० वाजेच्या दरम्यान पैठण ते दक्षिण जायकवाडी रस्त्यावर गोपाळ अप्पासाहेब मापारी हे दुचाकीवरून घरी जात असताना बिबट्या रस्ता ओलांडून उसाच्या शेतात जाताना त्यांना दिसला़ तसेच गाव शिवारातील गट क्रमांक १२० मध्ये कृष्णा बाजीराव बारे यांना, तर गट क्र. ११४ मध्ये अंतिकाबाई भाऊसाहेब भोसले यांनाही परिसरात बिबट्याचे दर्शन झाले़ संभाजी शिंदे, आशिष मापारी, सुदाम निवारे, अमोल कासोदे यांनीही बिबट्या बघितल्याचा दावा केला आहे़ यानंतर एकमेकांनी याबाबत गावकऱ्यांना मोबाईलवरून माहिती देत सावध केले आहे़ दरम्यान, मंगळवारी सकाळी गावातील खंडोबा मंदिरालगत असलेल्या भागात या बिबट्याने दोन कुत्र्यांचा फडशा पाडल्याचे निदर्शनास आले़ भगवान मापारी यांनी वन खात्यास माहिती दिली़ वनपरिक्षेत्र अधिकारी आऱ ए़ नागापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बी़ वाय़ बोडखे, वनरक्षक गोविंद वैद्य, के़ व्ही़ राजगे यांनी कर्मचाऱ्यांसह जुने कावसान येथे धाव घेत बिबट्याच्या पदमार्गावरील ठसे घेतले, तसेच नागरिकांचा जबाब घेत पंचनामा केला़