कुत्र्याने तोडले लचके

By Admin | Updated: January 4, 2015 01:15 IST2015-01-04T01:09:45+5:302015-01-04T01:15:19+5:30

औरंगाबाद : फेरफटका मारण्याच्या निमित्ताने घरातून बाहेर पडलेल्या ७८ वर्षीय वृद्धाचा चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला. मात्र, चार दिवस कोणीही निपचत पडलेल्या देहाकडे लक्ष दिले नाही.

Dog breaks out | कुत्र्याने तोडले लचके

कुत्र्याने तोडले लचके

औरंगाबाद : फेरफटका मारण्याच्या निमित्ताने घरातून बाहेर पडलेल्या ७८ वर्षीय वृद्धाचा चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला. मात्र, चार दिवस कोणीही निपचत पडलेल्या देहाकडे लक्ष दिले नाही. मृतदेह कुजू लागला आणि कुत्र्यानेही त्याचे लचके तोडायला सुरुवात केल्याचे लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या मृतदेहाला घाटीत नेले. हा प्रकार सातारा परिसरात शनिवारी उघडकीस आला.
याविषयी सातारा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा परिसरातील संतोषनगर येथील रहिवासी कमलाकर गोपाल दुसाणे हे वृद्ध ३० डिसेंबर रोजी सायंकाळी फेरफटका मारून येतो, असे सांगून घरातून बाहेर पडले.
घरापासून काही अंतरावर असलेल्या एमआयटी हॉस्पिटलमागील कासलीवाल मार्वलपासून खाचखळग्याच्या रस्त्याने ते डोंगराकडे निघाले. रस्त्याशेजारील एका डोंगराच्या पायथ्याजवळ ते पडले. त्यावेळी त्यांच्या मदतीसाठी कोणीही नव्हते. तेथेच त्यांचा मृत्यू झाला. शिवाय कोणाची नजरही त्यांच्याकडे गेली नाही.
घरातून बाहेर पडलेले कमलाकर घरी परत आले नाहीत म्हणून चिंताग्रस्त नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. जवळपासच्या सर्व नातेवाईकांकडे त्यांची चौकशी केली. शेवटी त्यांनी सातारा पोलीस ठाणे गाठून ते घरातून निघून गेल्याचे कळविले. दरम्यान, जेथे ते पडलेले होते, तेथून जवळच एका घराचे बांधकाम सुरू आहे. तेथील लोकांना दोन दिवसांपासून मृतदेह कुजल्यासारखा दुर्गंधीचा वास येत होता.
मात्र, त्यांनी त्या दुर्गंधीकडे दुर्लक्ष केले. आज सकाळी दुर्गंधी अधिक तीव्र झाली आणि जेथून दुर्गंधी येत होती तेथे कुत्रेही जमा झाल्याचे त्यांच्या निदर्शनास पडले. त्यामुळे कामगारांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता वृद्धाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडलेला दिसला.
तसेच त्या मृतदेहाचे लचकेही कुत्र्यांनी तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही घटना तातडीने पोलिसांना कळविली. जमादार मरकड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह घाटीत दाखल केला. कमलाकर यांच्या नातेवाईकांना बोलावून हा मृतदेह त्यांना दाखविला तेव्हा त्यांनी तो ओळखला. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Web Title: Dog breaks out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.