डॉक्टरांचा ॲप्रॉन फक्त कोट नाही, ही एक जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:21 IST2021-02-05T04:21:57+5:302021-02-05T04:21:57+5:30
औरंगाबाद : वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर पांढरा ॲप्रॉन परिधान केला जातो; परंतु हा फक्त कोट नाही, तर एक जबाबदारी ...

डॉक्टरांचा ॲप्रॉन फक्त कोट नाही, ही एक जबाबदारी
औरंगाबाद : वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर पांढरा ॲप्रॉन परिधान केला जातो; परंतु हा फक्त कोट नाही, तर एक जबाबदारी आहे. साधा इंजेक्शनचा डोस जरी चुकला तरी रुग्णावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे मन लावून अभ्यास करावा. वैद्यकीय ज्ञान जोपासण्यासोबत रुग्णांशी संवाद साधावा, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी ‘डीनस् अॅड्रेस’ कार्यक्रमात एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सभागृहात मंगळवारी हा कार्यक्रम झाला. यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. येळीकर बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख अथिती म्हणून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची उपस्थिती होती. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. भारत सोनवणे, डॉ. सुधीर चौधरी, डॉ. प्रतीमा कुलकर्णी, डॉ. रेषाकिरण शेंडे, डॉ. सईदा अफरोज, डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची उपस्थिती होती.
डॉ. येळीकर म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी आजचा अभ्यास उद्यावर ढकलू नये. यश मिळविण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. पुस्तकांना मित्र केले पाहिजे. ज्ञान शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जबाबदारीचे करिअर निवडले आहे, याचे नेहमी भान ठेवले पाहिजे. पालकांनीही नेहमी मुलांच्या अभ्यासाबाबत जागरूक राहावे. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अधिष्ठातांच्या हस्ते ॲप्रॉन प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. आराधना देशमुख, डॉ. प्रतिभा देशमुख, डॉ. सय्यद अश्फाक यांनी केले.
प्रामाणिकपणे काम करा
सुनील चव्हाण म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी मिळविण्याची जिद्द असणे आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करा. फक्त ते काम प्रामाणिकपणे करा. यश तुमचेच राहील.
फोटो ओळ..
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमप्रसंगी दीपप्रज्वलन करताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण. यावेळी (डावीकडून) डॉ. सुधीर चौधरी, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. प्रतिमा कुलकर्णी, डॉ. भारत सोनवणे, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर.