मोदींना महाराष्ट्राची नाळ माहीत आहे का?
By Admin | Updated: October 8, 2014 00:48 IST2014-10-08T00:28:27+5:302014-10-08T00:48:43+5:30
रांजणी : भाजपाने सत्तेसाठी बहुजन समाजातील गोपीनाथ मुंडे, प्रकाश शेंडगे यांचा वापर केलेला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्राची नाळ काय माहीत,

मोदींना महाराष्ट्राची नाळ माहीत आहे का?
रांजणी : भाजपाने सत्तेसाठी बहुजन समाजातील गोपीनाथ मुंडे, प्रकाश शेंडगे यांचा वापर केलेला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्राची नाळ काय माहीत, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते तथा महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष छगन भूजबळ यांनी केला.
घनसावंगी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश टोपे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी रांजणी येथे आयोजित जाहीर सभेत भूजबळ बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते अंकुशराव टोपे, माजी आ. प्रकाश शेंडगे, अलपसंख्याक आयोगाचे मुनाफ हकीम, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, जालना मतदार संघातील उमेदवार खुशालसिंह ठाकूर, परतूर मतदारसंघातील उमेदवार राजेश सरकटे, इकबाल पाशा, आलमखान यांची प्रमुख उपस्थिती होती.
भूजबळ पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत केंद्रातील काँग्रेस नेत्यांच्या भ्रष्टाचारामुळेच युपीएचे पतन झाले. यात नरेंद्र मोदींची कुठलीही लाट नव्हती, ना त्यांचा कुठला करिष्मा.
मोदींना कांद्याचे भाव वाढले तर चिंता वाटते, परंतु शेतकऱ्यांच्या मालाला भाव वाढवावा, याविषयी कसलीच चिंता वाटत नाही, असा आरोप भूजबळ यांनी केला.
या मतदारसंघात टोपेंविरोधात उमेदवार मुंबईहून इम्पोर्ट एक्स्पोर्ट केलेले आहेत. ते कधीही तुम्हाला सोडून जातील, असा इशारा देऊन भुजबळ यांनी टोपे यांच्या कार्यपद्धतीचे मुक्तकंठाने कौतूक केले. विकासाभिमुख नेता म्हणून ते परिचित असल्याचे म्हटले.
यावेळी शेंडगे, हकीम, सुदाम शिंदे, अॅड. संजय काळबांडे यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन नाना उगले यांनी केले. (वार्ताहर)