आणखी शेतकरी आत्महत्या होण्याची वाट पाहू नये- शिंदे
By Admin | Updated: November 15, 2014 23:54 IST2014-11-15T23:51:54+5:302014-11-15T23:54:42+5:30
औंढा नागनाथ : शासनाने आणखी आत्महत्या होण्याची वाट न पाहता तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिवसेनेचे विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी शासनाकडे केली आहे.

आणखी शेतकरी आत्महत्या होण्याची वाट पाहू नये- शिंदे
औंढा नागनाथ : मराठवाड्यात पडलेल्या कमी पावसामुळे शेतकऱ्यांवर भिषण दुष्काळ ओढावला असून, नैराश्येपोटी आतापर्यंत ६० च्या वर शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असल्याने शासनाने आणखी आत्महत्या होण्याची वाट न पाहता तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिवसेनेचे विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी शासनाकडे केली आहे.
शिंदे हे औंढा येथे ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी आले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, शिवसेनेच्या वतीने सध्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी नऊ आमदारांचे पथक संपूर्ण मराठवाड्यात फिरणार आहेत. पाऊस नसल्याने उभी पिके हातची गेली आहेत. काही ठिकाणी पाणी असूनही वीज नसल्याने पर्याय उरला नाही. नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत.
आत्महत्येचे सत्र वाढत चालले असून, मराठवाड्यात आतापर्यंत ६० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ही दुर्देवी बाब आहे. दुष्काळ जाहीर करून या भागातील शेतकऱ्यांना विशेष पॅकेज देऊन मदत जाहीर करावी, नसता या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे पाप सरकारच्या माथी आल्याशिवाय राहणार नसल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
सरकार स्थापनेपूर्वी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री नसताना लातूरच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी स्वत: दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. आता ते मुख्यमंत्री असून, त्यांनी त्यांचा विशेष अधिकाराचा वापर करून मराठवाडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिंदे यांनी करून येत्या नागपूर विधानसभा अधिवेशनात सेना याबाबत आवाज उठविणार असल्याचे सांगितले.
यावेळी माजी आ. गजानन घुगे, शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष बांगर, उपविभागीय अधिकारी अनुराधा ढालकरी, तहसीलदार श्याम मदनूरकर, गटविकास अधिकारी विठ्ठल सुरूसे, जि.प.अध्यक्षा लक्ष्मीबाई यशवंते, उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे, पं.स.सभापती राजेंद्र सांगळे, उपसभापती अनिल देशमुख, अंकुश आहेर, ज्ञानेश्वर झटे, दत्तराव दराडे, उद्धवराव गायकवाड, बबन इधारे आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)