शेतकऱ्यांच्या तक्रारीची वाट पाहू नका
By Admin | Updated: August 10, 2014 01:29 IST2014-08-10T00:12:13+5:302014-08-10T01:29:53+5:30
शेतकऱ्यांना रास्तभाव मिळवून देण्याचे आदेश राज्याचे पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी हिंगोली बाजार समितीला दिला.

शेतकऱ्यांच्या तक्रारीची वाट पाहू नका
हिंगोली : बाजार समितीत उत्पादकांचा माल वाढताच भाव पडतात तेव्हा बाजार समितीने बघ्याची भूमिका घेऊ नये. शिवाय तक्रारीची वाट पाहत बसू नये कारण तक्रार करायला शेतकऱ्यांजवळ वेळ नाही. त्यावेळी स्वत: हस्तक्षेप करून मोजमाप घेवून शेतकऱ्यांना रास्तभाव मिळवून देण्याचे आदेश राज्याचे पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी हिंगोली बाजार समितीला दिला.
हिंगोली कृउबातील टिनशेडच्या उद्घानानंतर डॉ. माने बोलत होते. व्यासपीठावर माजी आ. गजानन घुगे, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, सचिव डॉ.जब्बार पटेल, प्रशासक डी.एस. हराळ, नगराध्यक्षा अनिता सुर्यतळ, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी संचालक सुनील पाटील गोरेगावकर, सेनगावचे सभापती नारायण खेडकर, माजी संचालक रामेश्वर शिंदे, प्रतिभा डहाळे, प्रकाशचंद्र सोनी, सतिश विडोळकर, पिपल्स बँकेचे अध्यक्ष सुनील देवडा, ज्ञानेश्वर मामडे, मनमोहन सोनी, विशेष लेखा परीक्षक काकडे, बुलढाणा कृउबाच्या सचिव वनिता साबळे आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांना मालानुसार भाव मिळत नाही. मालाची ग्रेडींग होत नसल्यामुळे रास्त भावाचा प्रश्न येत नाही. ही उत्पादकांची पिळवणूक तसेच शोषण होवू नये म्हणून बाजार समितीचा कायदा करण्यात आल्याचे माने म्हणाले. कामकाजाबाबत आत्मपरीक्षण करण्याची वेळ बाजार समित्यांवर येऊन ठेपली आहे. निव्वळ मार्केट फीस गोळा करण्याचे एकच ध्येय बाजार समितीचे नसून व्यापाऱ्यांच्या दप्तरांची तपासणी करा, उत्पादकांना रास्त भाव मिळवून देण्याच्या सूचना डॉ. माने यांनी हिंगोली कृउबा प्रशासनास दिल्या. तत्पूर्वी माजी आ. घुगे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुनील प्रधान यांनी तर आभार उपनिबंधक अशोक गिरी यांनी मानले.
....यासाठी परवानगी
बाजार समित्यांत व्यापाऱ्यांची एकाधिकारशाही निर्माण झाल्याने रास्तभाव मिळत नाही. म्हणून वैयक्तिक तसेच खासगी बाजार समित्यांना परवानगी दिली जात आहे. त्यातून व्यापाऱ्यांत स्पर्धा होवून उत्पादकांना चांगला भाव मिळेल तसेच शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध होईल, असा उद्देश आहे.
माने यांच्याकडे मागणी
२०१०-११ वर्षीचे आर्थिक व्यवहाराचे रेकॉर्ड माहितीच्या अधिकाराखाली मिळविल्याने बाजार समित्याच्या व्यवहारात अफरातफर झाली आहे. त्याची तक्रार केली असता जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने गोलमाल व दिशाभूल करणारे उत्तर दिले. त्यामुळे या व्यवहाराच्या चौकशीची मागणी देवळा येथील व्यापारी गोपाल ढोणे यांनी डॉ. माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)