पितळ उघडे पडू नये म्हणून केला खटाटोप...!
By Admin | Updated: February 4, 2016 00:35 IST2016-02-04T00:30:07+5:302016-02-04T00:35:07+5:30
जालना : अन्न व औषधी प्रशासनाने मंगळवारी विविध छाप्यांत जप्त केलेल्या गुटखा नष्ट केल्याबाबतची वस्तुस्थिती लोकमतने मांडली.

पितळ उघडे पडू नये म्हणून केला खटाटोप...!
जालना : अन्न व औषधी प्रशासनाने मंगळवारी विविध छाप्यांत जप्त केलेल्या गुटखा नष्ट केल्याबाबतची वस्तुस्थिती लोकमतने मांडली. याद्वारे एफडीएच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तर बुधवारी कारभार न सुधारता त्यात अधिकच भर पडली असून सुगंधी तंबाखुचे केवळ रिकामे डब्बेच आढळून आले. त्यामुळे डब्यातील तंबाखू गेली कोठे, हाही प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
अन्न व औषधी प्रशासन विभागाने गेल्या वर्षभरात ३६ पैकी ३२ कारवायांतील ५ टन गुटखा नष्ट केल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात १४ जुलै २०१४ ते २६ आॅगस्ट २०१५ या कालावधीत अन्न व औषधी प्रशासन विभागाने २८ ठिकाणी कारवाया करून त्यातील १० लाखांचा साठा तसेच २५ व २६ आॅगस्ट या दोन दिवसांत बदनापूर पोलिसांनी पकडून दिलेला १ कोटी ८० लाखाचा साठा असा साठा गोदामात ठेवल्याची कबुली स्वत: अन्न व औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अ. गो. देशपांडे यांनी लोकमतला दिली होती. याबाबत पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी पकडलेल्या मालाची किंमत जरी एक कोटी असली तरी बाजारातील किंमत चार ते पाच कोटी असल्याचे सांगितले होते. त्याबाबतचे वृत्त २९ आॅगस्ट रोजी प्रकाशित झाले होते. २९ आॅगस्ट २०१५ पर्यंत जरी सुमारे दोन कोटींचा माल गोदामात पडून होता. तर त्यापुढे किती कारवाया केल्या ? त्या कारवायातील माल जप्त केला ? तो माल गेला कोठे ? गटखा बंदीबाबत अधिकतर कारवाया या पोलिसांनीच केलेल्या आहेत. पोलिस अंदाजित साठ्यांची किंमत काढते. त्यामुळे त्यांच्या आणि आमच्या किंमतीत तफावत असल्याचे सहाय्यक आयुक्त देशपांडे सांगतात.
मंगळवारी जाळण्यासाठी दोन ट्रकमध्ये गुटखा आणण्यात आला. ते ही अर्धेच भरलेले होते. त्यातील एकाच ट्रकचे मोजमाप करण्यात आले. दुसऱ्याचे मोजमाप न करताच तो अर्धामाल नष्ट करण्यासाठी कंपनीच्या भट्टीत टाकण्यासाठी उतरविला. बदनापूर पोलिसांनी जामवाडी येथील गोदामातून दोन भरगच्च भरलेले ट्रक गुटखा जप्त केला होता. तसेच सुंगधी तंबाखूही मोठ्या प्रमाणात जप्त केली होती. मंगळवारी नष्ट करण्यासाठी आणण्यात आली. मात्र सुंगंधी डब्यातील तंबाखूच गायब असल्याचे निदर्शनास आले. अनेक डब्बे रिकामाचे दिसून आल्याने डब्यातील तंबाखू गेली कुठे हा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. गुटखा जाळण्यासाठी एफडीएने जिल्हाधिकाऱ्यांना पाचरण करून आमचा कारभार किमी पारदर्शक आहे. हेच दाखविण्याचा प्रयत्न एफडीए ने केला. प्रत्यक्षात जप्त माल आणि जाळलेल्या मालाचे गौडबंगाल समोर येऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. त्यांच्या समक्ष काही माल त्या छोट्याशा भट्टीत जाळण्यात आला. स्वत: जिल्हाधिकारी आल्याने आपले कोणी काही करू शकत नाही. असा आव आणून निम्माच माल जाळण्यासाठी आणला. मग निम्मा माल गेला कुठे ? याची चौकशी होणे गरजेचे आहे.