सातव्या दिवशीही कारण कळेना!
By Admin | Updated: January 8, 2017 23:52 IST2017-01-08T23:49:32+5:302017-01-08T23:52:58+5:30
जालना : सुमित्रा होंडे खून प्रकरणाचा गुंता रविवारीही कायम राहिला.

सातव्या दिवशीही कारण कळेना!
जालना : सुमित्रा होंडे खून प्रकरणाचा गुंता रविवारीही कायम राहिला. रविवारी दिवसभर पोलिसांनी आरोपी विलास होंडे याची कसून चौकशी केली. मात्र, खून मी केला आहे, या कबुली जबाबाव्यतिरिक्त काहीही विशेष माहिती विलासने पोलिसांना दिली नाही. घटनेच्या सातव्या दिवशीही कारणाचा उलगडा न झाल्याने पोलिसांवर तपासाचे दडपण वाढले आहे.
पोलिसांनी सर्व बाजूंनी प्रश्न विचारुनही विलास खुनाचे कारण सांगत नसल्याने पोलिसांनी भावनिक पैलुची मदत घेत सलग दुसऱ्या दिवशीही विलास व त्याच्या बहिणीची भेट घडू देत तिच्या मदतीने त्याला बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. सोमवारी घटना घडून आठ दिवस पूर्ण होत असून, बुधवारी विलासच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने पोलिसांवरील तपासाचा दबाव कमालीचा वाढला आहे. सुमित्रा होंडे यांचा खून झाल्यानंतर मंगळवारी त्यांच्यावर होंडे कुटुंबीयाचे मूळ गाव तालुक्यातील साडेगाव येथे अत्यंसंस्कार करण्यात आले होते. अंत्यसंस्काराच्या दिवशी विलासने आपले स्वेटर व चप्पल आपल्या घरी सोडून दिली होती. शनिवारी पोलिसांनी विलासला साडेगाव येथे नेले व त्याठिकाणी असलेले त्याचे स्वेटर आणि चप्पल हस्तगत केली. खुनाच्या वेळी विलासने तेच स्वेटर घातलेले असल्याने त्या स्वेटरवर असलेली गन पावडर व चप्पलवर रक्ताचे काही डाग आहेत का, याची तपासणी करण्यासाठी या दोन्ही वस्तू पोलिसांनी प्रयोगशाळेत पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले. (वार्ताहर)