सरकारच्या अपयशाचे जागर करणार-विखे
By Admin | Updated: May 21, 2015 00:28 IST2015-05-21T00:17:39+5:302015-05-21T00:28:29+5:30
जालना : राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना त्यावर मात करण्यासाठी सरकारकडून कोणतेही प्रयत्न होत नाही. केवळ घोषणा केल्या जात आहेत.

सरकारच्या अपयशाचे जागर करणार-विखे
जालना : राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना त्यावर मात करण्यासाठी सरकारकडून कोणतेही प्रयत्न होत नाही. केवळ घोषणा केल्या जात आहेत. सरकारच्या या अपयशाचे जागर करून जनतेचा दबाव निर्माण करण्याचे काम पक्षाच्या वतीने केले जात असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यात दुष्काळी दौऱ्यानिमित्त विविध गावांना भेटी देऊन आल्यानंतर जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. सुभाष झांबड, आ. वसंत चव्हाण, विलास औताडे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, सुरेश जेथलिया, धोंडिराम राठोड, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा विमलताई आगलावे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष बदर चाऊस, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अब्दूल समीर, काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष प्रशांत वाढेकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अब्दूल हाफिज, वसंत डोंगरे, बाबूराव कुलकर्णी, विष्णूपंत कंटुले, बद्रीनारायण ढवळे, सुभाष काटकर, सुरेश तळेकर, संदीप गोरे, संदीप कड, सुभाष मगरे, अन्वर देशमुख, रवींद्र तौर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले की, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम नसून पर्यायाने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. आपण बदनापूर तालुक्यातील कुसळी येथील रोहयोअंतर्गत सुरू असलेल्या कामावरील मजुरांशी संपर्क साधला. हडप येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी स्व. एकनाथ लकडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर सततच्या नापिकीमुळे त्यांचे जीवन जगणे कठीण झाल्याने त्यांनी जीवनयात्रा संपविली, असे सांगण्यात आले. मौजपुरी येथील भीषण पाणीटंचाईग्रस्त ग्रामस्थांशी संवाद साधून दुष्काळाची तीव्रता समजून घेतली.
शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे सर्व बँकांचे कर्ज माफ व्हावे, शेतकऱ्यांकडील संपूर्ण वीजबिल माफ व्हावे, खरीप हंगामातील दुष्काळ अनुदानाचे वाटप अद्याप सर्व शेतकऱ्यांना मिळालेले नाही, सदरचे अनुदान त्वरीत मिळावे अशा मागण्या विखे पाटील यांनी यावेळी केल्या.
त्यानंतर विरोधीपक्षनेते विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आपल्या भाषणातून युती सरकारवर कडाडून टीका केली. जिल्ह्यात शेतकऱ्यांना अद्यापही दुष्काळाचे अनुदान पूर्णपणे मिळालेले नाही. प्रशासनावर मंत्र्यांचा वचक नाही. बँकांकडून सहकार्य केले जात नाही, अशी टीकाही गोरंट्याल यांनी केली.
४माजी आमदार सुरेश जेथलिया म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीची भावना होती. तातडीच्या उपाययोजना करून शेतकऱ्यांचे प्रश्न दूर करण्याचे काम आघाडी सरकारने केले होते. मात्र सध्या युती सरकारला दुष्काळाचे निवारण करण्यात अपयश येत असून जिल्ह्यात प्रशासनाकडून सहकार्य नसल्याची टीका जेथलिया यांनी केली.