दोन जागा भरु नका
By Admin | Updated: July 20, 2014 00:27 IST2014-07-20T00:12:17+5:302014-07-20T00:27:32+5:30
नांदेड : वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्र सहाय्यक पदाच्या दोन जागा न भरण्याचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महावितरण कंपनीला दिला आहे़

दोन जागा भरु नका
नांदेड : वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्र सहाय्यक पदाच्या दोन जागा न भरण्याचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महावितरण कंपनीला दिला आहे़
महावितरण कंपनीने मार्च २०१४ मध्ये उपकेंद्र सहाय्यक या पदाच्या १९५७ जागा सरळसेवा भरतीद्वारे ३ वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरिता संबंधित उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज मागविले होते़ त्यासाठी एस़एस़सी़ व वीजतंत्री / तारतंत्री व्यवसायातील अथवा सेंटर आॅफ एक्सलंसमधील एनसीटीव्हीटी नवी दिल्लीकडून घेण्यात येणारे प्रमाणपत्र अशी अर्हता नमूद करण्यात आली होती़ १९५७ पैकी २०७ पदे अनुसूचित जाती प्रवर्गातील तर ६३ पदे भटक्या जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आले होते़ जाहिरातीच्या अनुषंगाने संतोष मुसळे यांनी वंजारी तर सखाराम वाघमारे यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणाच्या अनुषंगाने या पदासाठी अर्ज केला होता़ दोघांनीही संबंधित अर्हता ग्रहण केली होती़ २७ एप्रिल रोजी त्यांनी आॅनलाईन परीक्षा दिली़ यात ते उत्तीर्ण झाले़ ५ मे रोजी उत्तीर्णाची यादी जाहीर करण्यात आली़ त्यात या दोघांचाही समावेश होता़ यानंतर त्यांना मूळ कागदपत्रांसोबत नांदेड येथील महावितरणच्या झोनल आॅफिसमध्ये बोलावण्यात आले़
८ मे रोजी त्यांनी मूळ प्रमाणपत्र महावितरणकडे सादर केले़ निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर झाली़ त्यामध्येही दोघांचे नाव होते़ त्यामुळे दोन्ही उमेदवार हे नेमणुकीच्या आदेशाची वाट पाहत होते़ असे असताना अचानकपणे दोन्ही उमेदवारांना त्यांच्या मोबाईलवर सिनिअर मॅनेजर झोनल आॅफिस ए़एक़ेदारे यांच्या मोबाईल क्ऱ ७८७५४६९७३१ याद्वारे मॅसेज करून कळविण्यात आले की त्यांची निवड रद्द करण्यात आली़ याबाबतचे कारण नमूद नव्हते़ (प्रतिनिधी)
नांदेड झोनमध्ये आहेत ९० जागा
दोन्ही उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अॅड़अमित मुखेडकर यांच्यामार्फत रिटयाचिका दाखल करून आव्हान दिले़ न्यायमूर्ती एस़व्हीग़ंगापूरवाला व ए़एम़बदर यांच्या संयुक्त पिठापुढे ही याचिका सुनावणीला आली़ यावर न्यायालयाने अंतरिम आदेशान्वये भटक्या जमाती संवर्गातून एक जागा व अनुसूचित जाती संवर्गातील एक जागा रिक्त ठेवण्याबाबत महावितरणला आदेशित केले़ २३ जुलै रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे़ या भरतीमध्ये नांदेड झोनमधील ९० जागा आहेत़ ज्यात ४५ जागा नेमणुकीचे आदेश वीजवितरण कंपनीने दिले़ ४५ जागा रिक्त आहेत़