छत्रपतींच्या नावाने मतांचा जोगवा मागू नका
By Admin | Updated: October 7, 2014 00:12 IST2014-10-06T23:59:40+5:302014-10-07T00:12:45+5:30
वसमत : विधानसभा निवडणुकीत मते मागण्यासाठी मोदी छत्रपतींच्या नावाचा वापर करत आहेत. ते योग्य नाही. मतांचा जोगवा मागण्यासाठी छत्रपतींचे नाव वापरू नका,

छत्रपतींच्या नावाने मतांचा जोगवा मागू नका
वसमत : विधानसभा निवडणुकीत मते मागण्यासाठी मोदी छत्रपतींच्या नावाचा वापर करत आहेत. ते योग्य नाही. मतांचा जोगवा मागण्यासाठी छत्रपतींचे नाव वापरू नका, तर स्वत:चे कर्तव्य व काम जनतेला सांगा, असे खडे बोल माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी वसमत येथील जाहीर सभेत भाजपाला सुनावले. राष्ट्रवादीचे उमेदवार आ. जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रचारार्थ येथे सोमवारी शरद पवार यांची जाहीर सभा झाली.
सभेत पवार यांनी मोदी व केंद्र शासनाच्या धोरणावर कडाडून टीका केली. अच्छे दिन, अच्छे दिन म्हणून मते मागितली. आता कोठे गेले अच्छे दिन, असा सवाल करत जनतेची फसवणूक झाल्याचे शरद पवार यांनी सांगितले. मोदी पंतप्रधान झाल्यापासून शेतीमालाचे दर झपाट्याने उतरले. शेतकरी त्रस्त झाला आहे. सोयाबीन, कापूस यांचे दर घसरले. पाकिस्तान आपल्या देशात घुसून आक्रमण करतो आहे. आपले सैनिक प्राण गमावत आहेत. त्याची फिकीर पंतप्रधानांना नाही, तर ते मते मागण्यासाठी लोहा येथे येण्यास प्राधान्य देत असल्याची टीकाही शरद पवार यांनी केली. देशाच्या पंतप्रधानांना झोपेतही मीच दिसतो म्हणून ते जागोजागी माझ्या विरोधात बोलतात, अशी टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांसाठी आम्ही शून्य टक्के दराने कर्ज दिले. अन्नसुरक्षा कायदा केला. शेतीमालाला वाढीव दर कसा मिळेल यावरच लक्ष केंद्रित केले. महाराष्ट्राचा शेतकरी वाचला पाहिजे.
शेतकरी वाचवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. यासाठी राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत द्या, असे आवाहनही त्यांनी केले. आ. दांडेगावकर हे विकास करणारे नेतृत्व आहे. त्यांच्या मागे उभे रहा. अॅड. शिवाजीराव जाधव यांनी भाजपाकडून उभे राहण्याचा निर्णय आश्चर्यकारक आहे. त्यांचे हे वागणं बरं नव्हे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. सभेत मार्गदर्शन करताना आ. जयप्रकाश दांडेगावकर यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. कोणत्याही विकासाचा अनुभव व विकास काम नावावर नसतानाही मतदान मागण्यासाठी कसे येता? असा सवाल त्यांनी केला. (वार्ताहर)