डीएमआयसी, आॅटो क्लस्टरच्या प्रगतीचा उद्योजकांसमवेत आढावा
By Admin | Updated: July 16, 2014 01:27 IST2014-07-16T01:03:49+5:302014-07-16T01:27:25+5:30
औरंगाबाद : शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज मराठवाड्याच्या विकासाशी संबंधित प्रकल्पांवर चेम्बर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या (सीएमआयए) शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली.

डीएमआयसी, आॅटो क्लस्टरच्या प्रगतीचा उद्योजकांसमवेत आढावा
औरंगाबाद : शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी), आॅटो क्लस्टर, स्मार्ट सिटी आदी मराठवाड्याच्या विकासाशी संबंधित जिव्हाळ्याच्या प्रकल्पांवर चेम्बर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या (सीएमआयए) शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली.
सीएमआयएचे अध्यक्ष मुनीष शर्मा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राजेंद्र दर्डा यांची भेट घेतली. उद्योगपती राम भोगले यांनी मंत्र्यांना आॅटो क्लस्टरच्या प्रगतीविषयी माहिती दिली. या प्रकल्पाला जागा देण्यापासून केलेल्या मदतीबद्दल त्यांनी राजेंद्र दर्डा यांचे आभार
मानले.
डीएमआयसीच्या कोअर कमिटीमध्ये स्थानिकांना प्रतिनिधित्व दिले पाहिजे, अशी विनंती शिष्टमंडळाने राजेंद्र दर्डा यांना केली. डीएमआयसीमध्ये उत्पादित झालेली उत्पादने जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, मुंबई येथे सुलभरीत्या पोहोचविण्यासाठी एक डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर विकसित करावा, तसेच तेथे एखादा उद्योग आणि त्यावर अवलंबून असलेले काही लघुउद्योग आणावेत, म्हणजे अन्य भारतीय आणि परदेशी उद्योजक प्रकल्पात रस दाखवतील, अशी सूचना यावेळी उद्योगपतींनी केली.
केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट मंजूर केली आहे. ही संस्था औरंगाबादेत यावी यासाठी शालेय शिक्षणमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचना शिष्टमंडळाने केली. यावर राजेंद्र दर्डा यांनी वरील सर्व प्रश्न धसास लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे १७ जुलै रोजी औरंगाबादेत येत आहेत. त्यांच्याशी सीएमआयए शिष्टमंडळाने वरील सर्व विषयांवर चर्चा करावी, अशी सूचना त्यांनी केली.
शिष्टमंडळात मुनीष शर्मा, सीएमआयएचे सचिव रितेश मिश्रा, राम भोगले, उल्हास गवळी, मुकुंद कुलकर्णी, आशिष पोकर्णा आणि गुरुप्रीतसिंग बग्गा यांचा समावेश होता.
महत्त्वाची भूमिका
डीएमआयसी प्रकल्पान्वये शेंद्रा-बिडकीनचा ‘अर्ली बर्ड व्हेंचर’ म्हणून विकास करण्यासाठी, तसेच तेथे ‘स्मार्ट सिटी’ विकसित करण्यासाठी राजेंद्र दर्डा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, हे येथे उल्लेखनीय आहे.