दिवाळी संपली अतिक्रमणे हटवा!
By Admin | Updated: November 3, 2016 01:35 IST2016-11-03T01:31:41+5:302016-11-03T01:35:46+5:30
औरंगाबाद : शहरात ठिकठिकाणी मनपाला अतिक्रमण हटाव मोहीम राबवायची आहे. शासन आदेशानुसार पावसाळ्यात अतिक्रमणे काढता येत नाही.

दिवाळी संपली अतिक्रमणे हटवा!
औरंगाबाद : शहरात ठिकठिकाणी मनपाला अतिक्रमण हटाव मोहीम राबवायची आहे. शासन आदेशानुसार पावसाळ्यात अतिक्रमणे काढता येत नाही. त्यानंतर दिवाळीच्या तोंडावर कारवाई कशाला अशी एक ना अनेक कारणे मनपा अधिकाऱ्यांकडून देण्यात येत होती. आता दिवाळी पूर्णपणे संपलेली असून, युद्धपातळीवर अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरू करा, असे आदेश मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी प्रशासकीय विभागाला दिले.
भूमिगत गटार योजनेचे ड्रेनेजलाईन टाकण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमणांचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी तर अतिक्रमणांमुळे मनपा प्रशासनाला ड्रेनेजलाईनचा मार्ग बदलावा लागला. १२ ठिकाणी भूमिगत गटार योजनेचे काम थांबले आहे. रस्ते रुंद करण्याची कारवाईसुद्धा मनपाला करायची आहे. प्रत्येक वेळी अधिकारी विविध कारणे सांगत होते. बुधवारी सकाळी आयुक्त बकोरिया यांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी दिवाळी संपलेली असून, शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम व्यापक प्रमाणात राबवावी, असे आदेश दिले. यापुढे कोणतेही कारण आपण खपवून घेणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी दिला. आयुक्तांच्या आदेशामुळे अतिक्रमण हटाव विभाग शहरात कुठे कुठे कारवाई करायची आहे, याची यादीच तयार करीत आहे.
गोमटेश मार्केट येथील औषधी भवनचा मुद्दा मागील सहा महिन्यांपासून गाजत आहे. औरंगाबाद केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनला नाला भाडेतत्त्वावर देण्यात आला आहे.
४मनपाने यापूर्वी औषधी भवनला रीतसर नोटीसही बजावली आहे. राजकीय दबावामुळे ही कारवाई थांबविण्यात आली होती.
४पावसाळ्यात औषधी भवन खालून पाणी वाहून जात नाही. औषधी भवनवर लवकरात लवकर कारवाई करा, असे आदेशही आयुक्तांनी यावेळी दिले.
डेब्रिज रस्त्यावर नको
महापालिकेचे कंत्राटदार शहरात विविध भागात विकासकामे करतात. काम झाल्यानंतर डेब्रिज तेथेच ठेवून देण्यात येते. यापुढे प्रत्येक कामावर स्वत: कार्यकारी अभियंत्याने जाऊन पाहणी करावी. कंत्राटदाराने डेब्रिज उचलले किंवा नाही, असे लेखी प्रमाणपत्रच कंत्राटदाराला द्यावे. जोपर्यंत कार्यकारी अभियंता प्रमाणपत्र देणार नाही, तोपर्यंत कंत्राटदाराचे बिलच काढण्यात येऊ नये असे आदेश बुधवारी बैठकीत आयुक्तांनी लेखा विभागाचे मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांना दिले.