औरंगाबाद : सर्व जण ज्याची आवर्जून वाट पाहत असतात तोे दिवाळी महासण अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपला आहे. बाजारपेठेत खरेदीपर्वाला सुरुवातही झाली आहे. शहरवासी सर्वप्रथम रेडिमेड कपडे खरेदीला प्राधान्य देत आहेत. याशिवाय यंदा कोणती नवीन वस्तू घ्यायची याचेही नियोजन घरोघरी केले जात आहे. येत्या सात दिवसांत बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत दिवाळसणही दरवाजावर येऊन ठेपला आहे. बाजारपेठही ग्राहकराजाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. किराणा सामानापासून ते इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत सर्वांची विक्री होत आहे. दसऱ्यानंतर महिन्याचा पगार हाती पडला आणि मागील आठवड्याच्या उत्तरार्धात ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडले. बुधवारी १५ आॅक्टोबर रोजी मतदान झाल्यानंतर शहरवासी १६ पासून बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी करतील. १९ रोजी दिवाळी आधीचा शेवटचा रविवार असल्याने उलाढालीचा विक्रम होईल. बाजारपेठेच्या दृष्टीने पुढील आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. बाजारपेठेत, विशेषत: कापड बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. सायंकाळी तर रेडिमेड कपडे खरेदीला मोठी गर्दी दिसून आली. रेडिमेड कापड खरेदीत लहान मुलांच्या कपडे खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. फॅशनेबल कपडे खरेदीकडे चिमुकल्यांचा कल आहे. व्यापाऱ्यांनी सांगितले की, लहान मुलांच्या ड्रेसमध्ये शेकडो व्हरायटी आल्या आहेत. पूर्वी पालकांच्या पसंतीनुसार लहान मुलांचे कपडे खरेदी केले जात. मात्र, आता बालकांच्या पसंतीनुसार कपडे खरेदी केले जात आहेत. मोठ्यांप्रमाणे लहान मुलांमध्येही जीन्सची क्रेझ कायम आहे. साड्यांच्या दालनातही महिला चोखंदळपणे साड्या खरेदी करताना दिसून येत आहेत. १५ रोजी मतदान संपल्यानंतर रात्री कापड बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढेल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. रंगरंगोटीसाठी दुकानात गर्दी दिवाळी सणात लक्ष्मीच्या स्वागतासाठी घराला रंग देण्यात येतो. अनेक जण दरवर्षी न चुकता घराला आवर्जून रंग देतात. रंग खरेदीसाठी ठिकठिकाणच्या रंग विक्रेत्यांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी होत आहे. व्यापाऱ्यांनी सांगितले की, पूर्वी संपूर्ण अंतर्गत भिंतींना एकच रंग लावला जात असे. मात्र, आता बैठक रूममध्ये दोन प्रकारचा रंग दिला जात आहे, तसेच स्वयंपाकघरात, लहान मुलांच्या खोलीत वेगवेगळा रंग देण्यात येत असल्याने एकाच घरासाठी तीन ते चार प्रकारचा रंग खरेदी केला जात आहे.
बाजारपेठेत दिवाळी उत्सव
By admin | Updated: October 15, 2014 00:48 IST