छत्रपती संभाजीनगर : न्यायालयीन कामकाजादरम्यान ओळख झाल्यानंतर संवाद वाढवून एका ३९ वर्षीय महिलेवर दोन सख्खे भाऊ असलेल्या प्लॉटिंग एजंट्सने अत्याचार केला. शिवाय, धर्मपरिवर्तनासाठी छळ केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात जवाहरनगर पोलिसांनी शेख अजिम कासिम पटेल (४५) आणि शेख सलीम कासिम पटेल (४८, दोघे रा. बदाम गल्ली, किराडपुरा) यांना अटक केली.
३९ वर्षीय पीडिता पहिल्या पतीपासून विभक्त असून जवाहरनगर परिसरात राहते. काही महिन्यांपूर्वी एका न्यायालयीन कामकाजादरम्यान तिची अजिम सोबत ओळख झाली होती. मदतीच्या बहाण्याने त्याने महिलेसोबत ओळख वाढविली. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून तिच्यासोबत वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. मात्र, या दरम्यान खासगी क्षणांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून त्याने ब्लॅकमेलिंग सुरू करत पैशांची मागणी सुरू केल्याचा आरोप पीडित महिलेने केला. अजिमसोबत सलीमने देखील संगनमत करून पीडितेवर वारंवार अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. २६ जून व १० ऑगस्टला दोघा भावांनी तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करत जीवे मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली. दोघांच्या छळाला कंटाळून पीडितेने जवाहरनगर पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर दोन्ही भावांवर बलात्कार, धमकी देण्यासह ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस आयुक्त मनिष कल्याणकर, पोलिस निरीक्षक सचिन कुंभार, उपनिरीक्षक मारोती खिल्लारे यांच्या पथकाने दोघांचा शोध घेत बुधवारी रात्री अटक केली.
धर्मपरिवर्तनाचा गंभीर आरोपगुरूवारी पोलिसांनी अजिम व सलीमला न्यायालयात हजर केले. सहाय्यक लोकाभियोक्ता के. एन. पवार यांनी बाजू मांडताना, आरोपींनी पीडितेला धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडले. शिवाय, अनैसर्गिक अत्याचार केला. त्यामुळे आरोपींची वैद्यकीय तपासणी, अत्याचार झालेल्या जागांचा तपास, आरोपींच्या या कृत्यात आणखी कोणी मदत केली, याचा तपास करायचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर आरोपींना २२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश यू.आर. उबाळे यांनी गुरुवारी दिले. सहायक पोलिस आयुक्त मनिष कल्याणकर अधिक तपास करत आहेत.