मुस्लिम ऐक्याचे विराट दर्शन!
By Admin | Updated: January 6, 2017 00:25 IST2017-01-06T00:20:41+5:302017-01-06T00:25:33+5:30
उस्मानाबाद : विविध मागण्यांसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने गुरूवारी उस्मानाबादेत विराट मूकमोर्चा काढण्यात आला़

मुस्लिम ऐक्याचे विराट दर्शन!
उस्मानाबाद : मुस्लिम समाजाला शिक्षण, नोकरीत आरक्षण द्यावे, मुस्लिम शरियत कायद्यात कसलीही ढवळाढवळ करू नये यासह इतर विविध मागण्यांसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने गुरूवारी उस्मानाबादेत विराट मूकमोर्चा काढण्यात आला़ मोर्चाच्या प्रारंभी पांढरा ड्रेस आणि डोक्यावर भगव्या, पांढऱ्या आणि हिरव्या टोप्या घालून तिरंगा तयार करण्यात आला होता़ मुस्लिम समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या या रेकॉर्डब्रेक मोर्चाने अवघे शहर गजबजून गेले होते.
मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यात ठिकठिकाणी मुकमोर्चे काढण्यात येत आहेत़ या मागण्यांच्या पूर्तततेसाठी उस्मानाबाद शहरात महा- मुकमोर्चा काढण्यासाठी विविध पक्ष- संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गावा-गावात बैठका घेवून जनजागृती केली होती़ परिणामी गुरूवारी ५ जानेवारी रोजी सकाळपासूनच उस्मानाबाद शहरात जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी येण्यास सुरूवात केली होती़ गाजी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील पथदिव्याचे खांब व इतर आवश्यक ठिकाणी स्पिकर लावण्यात आले होते़ संयोजक या स्पिकरवरून अवश्यक त्या सूचना देत होते. एकाचवेळी सर्वत्र सूचना जात असल्याने मोर्चेकऱ्यांना नियोजनाची माहिती मिळत होती़ सकाळपासूनच गाजी मैदानावर नागरिकांची गर्दी सुरू झाली होती़ १० ते १०़३० वाजण्याच्या सुमारास गर्दीत वाढ होण्यास सुरूवात झाली़ दुपारी १ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रगिताने महा- मुकमोर्चास प्रारंभ झाला़ मोर्चाच्या प्रारंभी पांढरे ड्रेस आणि डोक्यावर भगवी, पांढरी आणि हिरवी टोपी परिधान करून युवकांनी तिरंगा तयार केला होता़ तर मोर्चातही अनेकांच्या हाती तिरंगा डौलाने फडकत होता. तिरंगा हमारी शान है, मुसलमानों की जान है़़़, देशाच्या विकासाचे लक्षण, मुस्लिमांना द्या आरक्षण़़़, हमें जवाब चाहिए़़़ जे़एऩयू़ का विद्यार्थी नजीब कहाँ है?़़़, सरकार हमको पढने दो, देश को आगे बढने दो़़, आरक्षणाबाबतचा १९५० चा अन्यायी अध्यादेश मागे घ्या़़़, आमच्या हक्काचा, अधिकारांचा हा लढा संविधानाचा़़़, नही बदलेगा मुस्लिम पर्सनल लॉ़़़, गोरक्षणाच्या नावाखाली होत असलेले अत्याचार त्वरित थांबवा़़़, दहशतवादाच्या संशयावरून, निष्पाप मुस्लिम तरूणांची अटक थांबवा़़़ अशा विविध मागण्यांचे नामफलक हाती घेवून युवकांसह ज्येष्ठ मुस्लिम नागरिक या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गाजी मैदान येथून निघालेला हा मूकमोर्चा मदिना चौक, शम्स चौक, अक्सा चौक, देशपांडे स्टँन्ड, ताजमहल टॉकीज, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ मोर्चाच्या प्रारंभीपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या मार्गावर ठिकठिकाणी मोर्चेकऱ्यांसाठी पाण्यासह अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती़ मोर्चाच्या आयोजकांसह सकल मराठा समाज, केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, तसेच इतर विविध संघटनांच्या वतीने मोर्चेकऱ्यांसाठी पाणी, अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती़ मोर्चात सहभागी लहान मुलांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले़ प्रार्थनेनंतर या विराट मोर्चाची अत्यंत शांततेत सांगता झाली़
तगडा पोलीस बंदोबस्त
शहरात निघणाऱ्या मुस्लिम मुक मोर्चात लाखोंचा जनसमुदाय सहभागी होणार असल्याने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ दिपाली घाडगे यांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता़ मोर्चाच्या मार्गावर, शहरात प्रवेश करणाऱ्या प्रमुख मार्गासह आवश्यक ठिकाणी बंदोबस्त तैैनात होता़ वाहतूक मार्गातही बदल केला होता़ मोर्चात सहभागी युवकांसह नागरिकांनी पोलिसांना वाहतूक वळविण्यासह इतर आवश्यक ठिकाणी स्वयंस्फूर्तपणे मदत केली़ शिवाय शांततेत मोर्चा यशस्वी केल्याने पोलिसांवर कोणताही ताण आल्याचे दिसले नाही़