जिल्ह्यात जन‘धन’ विस्कळीत !
By Admin | Updated: November 10, 2016 00:09 IST2016-11-10T00:13:02+5:302016-11-10T00:09:35+5:30
बीड : चलनातून बाद झालेल्या पाचशे, हजार रुपयांच्या नोटा कुठल्याही परिस्थितीत बदलून घेण्यासाठी बुधवारी जिल्ह्यात सर्वत्र नागरिकांची धावपळ सुरु होती.

जिल्ह्यात जन‘धन’ विस्कळीत !
बीड : चलनातून बाद झालेल्या पाचशे, हजार रुपयांच्या नोटा कुठल्याही परिस्थितीत बदलून घेण्यासाठी बुधवारी जिल्ह्यात सर्वत्र नागरिकांची धावपळ सुरु होती. दूधवाल्यापासून ते किराणा दुकानदारापर्यंत नोटा न स्वीकारल्याने व्यवहारात मोठ्या अडचणी आल्या. शंभर, पन्नास, वीस व दहा रुपयांच्या नोटांना पहिल्यांदाच ‘भाव’ आला. चिल्लरचा तुटवडा जाणवल्याने इंधनविक्री ठोक स्वरुपात झाली. संपूर्ण जन ‘धन’ विस्कळीत झाल्याचे चित्र जिल्हाभरात पाहावयास मिळाले.
हजाराला दहाची नोट भारी!
बँका, एटीएम बंद असल्याने खिशात उपलब्ध पैशांवरच दिवस काढण्याची वेळ अनेकांवर आली. हजार, पाचशे रुपयांच्या नोटा बाळगून मनसोक्त उधळपट्टी करणाऱ्यांनाही इच्छेला मुरड घालावी लागली. मोठ्या किंमतीच्या नोटा असूनही त्या व्यापारी स्वीकारत नसल्याने खर्च करण्यास अडचणी येत होत्या.
काही दुकानदार व हॉटेलचालकांनी बाहेरच पाट्या लावून ‘येथे हजार, पाचशे रुपयांच्या नोटा चालणार नाहीत’ अशी सूचना लिहिली होती. पहिल्यांदाच शंभर रुपये व त्याखालील नोटांचे महत्त्व सर्वांना कळून चुकले. हजाराला दहाची नोट भारी.. अशा प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.